मुंबई : उन्हाळ्यापासून सुटका मिळावी यासाठी राज्यातील विविध जलाशयांमध्ये पोहणे वा जलविहार करणे रविवारी १४ जणांच्या जीवावर बेतले़ यामध्ये नागपुरातील मंगरूळ तलावात सात, पुण्याच्या पवना धरणात ४ विद्यार्थ्यांचा, साताऱ्यात एका विद्यार्थ्याचा, तर ठाणे जिल्ह्यातील टिटवाळ्यात डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला़ नागपुरातील १० तरुण रविवारी सायंकाळी मंगरुळ तलावावर जलविहार करण्यासाठी गेले. नावाडी नसताना या तरुणांनी नावेत बसून ती तलावामध्ये नेली. याचवेळी काही जणांनी सेल्फी काढणे सुरू केले. सेल्फीच्या नादात १० ही तरुण नावेच्या एकाच बाजूला उभे झाले. त्यामुळे नाव पाण्यात उलटली. परिणामी सर्व तरुण पाण्यात बुडाले. तिघांना पोहता येत असल्याने ते काठावर पोहचले. उर्वरित सातही तरुण बुडाले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तलावाकडे धाव घेत शोधकार्य सुरू केले. परंतु अंधारामुळे रात्री उशिरापर्यंत एकही तरुण बाहेर काढण्यात यश आले नव्हते.पुण्याच्या लोणावळा येथील पवना धरणात सायंकाळी पिंपरी-चिंचवडच्या ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेजमधील फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिकणारे चार विद्यार्थी बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह हाती लागला. रात्री उशिरापर्यंत तिघांचा शोध लागू शकला नाही. उद्या पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. एन.सी.सी. कॅम्पसाठी आलेल्या पुण्याच्या विद्यार्थ्याचा सकाळी सातारा जिल्ह्णाच्या जावळी तालुक्यातील शिवसागर जलाशयात बुडून मृत्यू झाला. कॅम्प आटोपून पुण्याला परतण्याच्या तयारीत असताना काही विद्यार्थी पोहण्यास उतरले, तेव्हा ही दुर्घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे खेळता खेळता तोल गेल्याने दोन चिमुकल्यांचा डबक्यात बूडून मृत्यू झाला. (लोकमत न्यूजनेटवर्क)
रविवार ठरला घातवार; १४ जणांचा बुडून मृत्यू
By admin | Updated: March 23, 2015 01:22 IST