मुंबई, दि. २६ - मुंबई आयआयटीच्या विदयार्थ्यांनी तब्बल आठ वर्षे अथक परिश्रम घेऊन तयार केलेला ‘प्रथम’ या लघुउपग्रहाचे सोमवारी सकाळी ९ वाजता अवकाशात यशस्वी प्रक्षेपण झाले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन केंद्रातून अंतराळात झेपावणाऱ्या ‘प्रथम’कडे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांसह अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले होते. महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेला पहिला लघुउपग्रह असून, या लघुउपग्रहाचे प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधनात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागात शिक्षण घेणाऱ्या सप्तश्री बंडोपाध्याय आणि शशांक तमासकर या विद्यार्थ्यांना जुलै २००७मध्ये ‘प्रथम’ची संकल्पना सुचली. त्यानुसार आयआयटीच्या एरोस्पेस इंजिनीअरिंगच्या विभागाने त्याची बांधणी सुरू केली. त्सुनामीसारख्या प्रलयाची पूर्वकल्पना देण्याची क्षमता ‘प्रथम’मध्ये आहे, असा दावा मुंबई आयआयटीने केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या १० किलो वजनाच्या या उपग्रहाचे इस्रोनेही कौतुक केले आहे.
इंडियन स्पेस रिसर्चने २००९मध्ये या लघुउपग्रहाबाबत करार केला. मात्र काही कारणास्तव या उपग्रहाच्या उड्डाणाला हिरवा कंदील मिळत नव्हता. दरम्यानच्या काळात ‘प्रथम’मध्ये अनेक बदल करण्यात आले. सोमवारी अंतराळात उड्डाण केल्यानंतर हा लघुउपग्रह ४ महिने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. यातील २ महिन्यांत विद्यार्थी ‘प्रथम’ची अंतराळातील बाह्य चाचणी करतील. त्यातील त्रुटी टिपून नव्या प्रकल्पामध्ये बदल करण्यात येतील. हा लघुउपग्रह अंतराळात असताना भारतातील वातावरणाचा अभ्यास करेल, तसेच वातावरणातील बदल टिपेल.प्रकल्पाचे उद्दिष्ट आयआयटीसोबतच एरोस्पेस इंजिनीअरिंगची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम’ हक्काचे व्यासपीठ आहे. भविष्यात देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांना एकत्र घेऊन प्रथमचे काम अखंड सुरू राहावे, हा या मागील हेतू आहे.‘प्रथम’चे उद्दिष्ट वातावरणातील बदल अभ्यासणे. इलेक्ट्रॉनचा अभ्यास करणे.अधिकाधिक विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाची आवड निर्माण करणेअशी होते निवड आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये सप्टेंबरमध्ये ‘प्रथम’च्या नव्या टीमची निवड केली जाते. यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्याशिवाय विद्यार्थ्यांना सादरीकरण करावे लागते. त्यातून विद्यार्थी निवडले जातात. दरवर्षी साधारणत: ३० विद्यार्थ्यांची टीम प्रथमसाठी काम करते.