लोणावळा (पुणे) : राजमाची किल्ला परिसरातील कातळदरी धबधबा येथे रविवारी रॅपलिंगसाठी पुण्यातून आलेल्या सह्याद्री अॅडव्हेंचरच्या पथकातील १९ जण जंगलात भरकटले होते. त्यांना येथील शिवदुर्ग संस्थेच्या रेस्क्यू पथकाने शोधून सुरक्षितपणे बाहेर आणले.पथकातील सदस्यांकडे साध्या टॉर्चसुद्धा नसल्याने रात्री जंगलात सैरभैर भटकत होते. मात्र, त्यांना वाट सापडत नव्हती. रात्री नऊच्या सुमारास शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू पथकाला फोन आल्यानंतर, शिवदुर्गचे सुनील गायकवाड, रोहित वर्तक, अमोल परचंड, महेश मसणे, समीर जोशी, सागर पाठक, ब्रिजेश ठाकूर, गणेश गायकवाड, ओंकार पवार, प्रणय अंभोरे, अनुराग यादव, विकास मावकर, प्रवीण देशमुख, अजय शेलार यांच्या टीमने राजमाचीकडे रात्री कूच केली. आवाज व मोबाइल लाइटच्या सिग्नलच्या साहाय्याने मध्यरात्री दीडच्या सुमारास सर्व १९ जणांना सुखरूप लोणावळ्यापर्यंत आणले. लोणावळा परिसरात शनिवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, पावसाची व अंधाराची तमा न बाळगता, शिवदुर्गने प्रसंगावधान राखत भरकटलेल्या पर्यटकांना शोधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. (वार्ताहर)>शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू पथकाने आवाज व मोबाइल लाइटच्या सिग्नलच्या साहाय्याने सर्व १९ जणांना सुखरूप लोणावळ्यापर्यंत आणले.
राजमाचीत भरकटलेल्या १९ जणांना शोधण्यात यश
By admin | Updated: August 2, 2016 05:12 IST