सिंधुदुर्ग - राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप विरोधक सातत्याने सत्ताधारी सरकारवर करत आहे. वेदांता फॉक्सकॉनपासून विविध प्रकल्पावरून विरोधकांनी सरकारची कोंडी केली. त्यातच आता राज्याचा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी करत सरकारवर निशाणा साधला आहे.
आमदार वैभव नाईक म्हणाले की, सिंधुदुर्ग किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाईल. २०१८ मध्ये पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्र विभागाच्या पर्यटन खात्याने सिंधुदुर्गात आणला होता. त्यानंतर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या प्रकल्पाला निधीची तरतूद केली होती.मात्र आता या प्रकारचे चांगले प्रकल्प गुजरातला नेण्याचा गुजरात शासन आणि केंद्र सरकारचा डाव आहे. हा डाव समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ३ मंत्री राज्य सरकारमध्ये आहेत. १ मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे. असे असताना हा प्रकल्प गुजरातला नेणे म्हणजे महाराष्ट्राची गद्दारी केल्यासारखे आहे असं त्यांनी टीका केली.
तर महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर चाललेत त्यावर कॅबिनेटमध्ये बोलण्याची नारायण राणे यांच्यात ताकद नाही. मी २५ वर्ष शिवसेनेत होतो असं ते म्हणतात. मग त्यांनी चोखबाणा दाखवावा आणि राज्यातला एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही असं बोलावे. हिंमत आहे का? ज्यांनी शिवसेनेचे नाव चोरले त्यांनी सांगावे. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी बोलावे. राज्यातला एकही उद्योग आणि रोजगार बाहेर जाऊ देणार नाही असं तुमच्यात हिंमत नाही अशा शब्दात राऊतांनी एकनाथ शिंदे-अजित पवारांवर निशाणा साधला.
काय आहे प्रकल्प?२०१८ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात पर्यटन विभागाकडून १ हजार कोटींची तरतूद असलेला पाणबुडी प्रकल्प आणला होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना खोल समुद्राच्या पाण्यातील अतरंग अनुभवता येणार होते. मात्र आता हा प्रकल्प गुजरातच्या द्वारका इथं होणार असल्याची बातमी आहे.गुजरात सरकारने यासाठी माझगाव डॉक लिमिटेडसोबत करार केल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकांत आले आहे.