राजापूर : शाळांमधील स्वच्छतागृहांचा अभाव तसेच शैक्षणिक व्यवस्थेतील इतर अडचणी दूर करून विद्यार्थिनींच्या शाळा सोडण्याचे प्रमाण येत्या पाच वर्षांत शून्यावर आणण्यात येईल, असा निर्धार शालेय शिक्षण, क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज, सोमवारी आडिवरे (ता. राजापूर) येथे व्यक्त केला. कोकणातील शैक्षणिक गुणवत्तेला संधी देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी ठोस प्रस्ताव घेऊन पुढे यावे. त्यांच्या प्रस्तावांचा सकारात्मक विचार केला जाईल, असा विश्वासही त्यांनी कोकणवासीयांना दिला.क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या आडिवरे येथील तावडे अतिथी भवनाचे भूमिपूजन आज मंत्री तावडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामदैवत किंवा कुलदैवत हा आपल्या श्रद्धेचा, इतिहासाचा आणि संस्कृतीचा भाग आहे. ज्या मातीतून आपण जन्माला आलो, त्या मातीचा अभिमान बाळगणे आणि तिथली मुळे घट्ट करणे, ही परंपरा जपणारी तसेच बळ देणारी गोष्ट आहे. यश आणि पदाच्या बरोबरीने येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हे बळ उपयोगी पडते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. येत्या पाच वर्षांत राज्याचा विकास करताना कोकणच्या सर्वांगीण विकासावर आपला विशेष भर राहणार असल्याचे सांगतानाच कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.मंडळाचे अध्यक्ष इंद्रनील तावडे, सचिव सतीश तावडे, उपाध्यक्ष दिनकर तावडे, माजी आमदार प्रमोद जठार, संजय यादवराव, आदींसह राज्याच्या सर्वदूर भागातून आलेले मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी विनोद तावडे यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांशी विकासकामांची सद्य:स्थिती आणि त्यांच्या अंमलबजावणीतील अडचणी सोडविण्याबाबत चर्चा केली. शासकीय कार्यालयांसाठी आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करणे, रस्त्यांच्या विकास प्रक्रियेला गती देणे, शैक्षणिक उपक्रमांसाठी प्रलंबित मंजुरी तातडीने देणे, पर्यावरणाचे प्रलंबित प्रश्न सोडविणे, आदींबाबतही यावेळी चर्चा झाली. जिल्हा पोलीस प्रमुखांकडून त्यांनी यावेळी कायदा-सुव्यवस्थेचाही आढावा घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे, आदी अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) अडीच वर्षांत राज्यावरील कर्ज फेडू : तावडेकणकवली : शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेईन आणि मग राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवेन, असे सांगून राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. भ्रष्टाचारामुळे यातील बरेचसे कर्ज झाले आहे. आम्ही आहोत तर भ्रष्टाचार होणार नाही आणि विकासही गतिमान होईल. त्यामुळे हे कर्ज येत्या अडीच वर्षांत फेडणे शक्य होईल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जानवली येथे प्रतिनिधींशी संवाद कार्यक्रमात व्यक्त केला. ‘शिवसेना सत्तेत सहभागी होणारच’दरम्यान, स्थिर सरकारसाठी युतीतील गुंता अद्याप सुटला नसला तरी भविष्यात शिवसेना सत्तेत नक्की सहभागी होऊन अभेद्य युतीचे सरकार पाच वर्षे स्थिर राहील, असा विश्वास राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आडिवरे येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राज्यातील विद्यमान सरकार हे राष्ट्रवादीच्या टेकूवर असल्यामुळे ते पाच वर्षे काढील, याची खात्री भाजपला नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्तेत सहभागी करता यावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना सत्तेत येईल आणि सरकार स्थिर असल्याचा दावाही तावडे यांनी केला.
विद्यार्थिनींच्या गळतीचे प्रमाण शून्यावर आणणार : तावडे
By admin | Updated: December 2, 2014 00:12 IST