मुंबई : एसटी मुख्यालयाच्या धर्तीवर राज्यातील सर्व आगारांवर सोलार पॅनल लावण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. मंगळवारी एसटीच्या वाहन शोध व प्रवाशी माहिती प्रणालीचे उद्घाटन रावते यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.एसटीने काही महिन्यांपूर्वी मुख्यालयात सोलार पॅनल लावले होते. यामुळे एसटीच्या विजेचा खर्च १० ते १२ टक्क्यांनी कमी झाला. याच धर्तीवर एसटीच्या राज्यातील सर्व आगारांत सोलार पॅनल बसविण्यात येतील. यातून निर्माण होणारी अतिरिक्त वीज महावितरणला देण्याचा विचार आहे. यातून एसटीचा तोटा कमी करण्यास मदत होईल, असे रावते म्हणाले.याशिवाय परिवहन महामंडळाच्या सुमारे १८ हजार बसेससाठी वाहन शोध आणि प्रवासी माहिती प्रणालीच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांशी बोलताना रावते म्हणाले की, या प्रणालीमुळे एसटी नेमक्या कोणत्या मार्गे जाणार, यासह एसटीची नेमकी वेळ प्रवाशांना समजेल. या प्राणालीअंतर्गत बस स्थानकांवर एलसीडी टीव्हीवर गाड्यांची प्रत्यक्ष येण्याची, सुटण्याची वेळ समजेल, एखादी एसटी उशिरा आल्यास तिची माहिती मिळेल. सध्या हा प्रकल्प मुंबई, पुणे आणि नाशिक या डेपोमध्ये सुरू केला असून, उर्वरित सहा महिन्यांत इतर सर्व भागांत ही प्रणाली सुरू करण्यात येईल. यासाठी पाच वर्षांसाठी ३२ कोटी ५५ हजार रुपयांचा करार केला आहे.प्रणालीमुळे एसटी चालकांच्या ओव्हर स्पीडिंगलादेखील आळा बसेल. एसटीने किती वेळेत प्रवास पूर्ण केला, चालकांनी मार्ग बदलला का, याची माहिती कंट्रोल रूमला त्वरित मिळेल. हे अॅप सहा महिन्यांत कार्यान्वित होईल. गुजरातनंतर महाराष्ट्र हे अशा प्रणालीचे अवलंब करणारे दुसरे राज्य असेल, असे रावते म्हणाले. दरम्यान, बेशिस्त एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनासंदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे रावते यांनी सांगितले.
एसटीची हायटेक वारी, सर्व आगारांवर लागणार सोलार पॅनल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 01:56 IST