- नरेश डोंगरे नागपूर - प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा द्यायची आहे, बसस्थानकेही चकाचक करायची आहे. त्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ करणे क्रमप्राप्त ठरते, त्यानुसार, १४.९५ टक्के प्रवासभाडे वाढविण्याचा प्रस्ताव शासनाला दिल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी पत्रकारांना दिली.
एसटी महामंडळाची ३०६ वी बैठक आज 'वनामती'मध्ये पार पडली. बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती, उत्पन्नाचे स्त्रोत तसेच प्रवासी सुविधा आणि महामंडळ कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर गोगवले यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, लाडकी बहीण योजनेमुळे राज्यात एसटी प्रवाशांची संख्या चांगली वाढली आहे. सध्याच्या घडीला एसटीच्या एकूण १४ हजार बसेस वेगवेगळया मार्गावर धावत आहे. प्रवाशांच्या तुलनेत बसेस कमी असल्याने प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. उपलब्ध असलेल्या बसेसपैकी काहींची अवस्था खराब आहे. परिणामी प्रवाशांची गैरसोय होते.
तशा तक्रारीही नेहमी प्राप्त होतात. त्यामुळे नव्या वर्षात तब्बल ३५०० बसेस घेण्याचे ठरले आहे. त्यापैकी सुमारे २२०० बसेस या लेलँड कंपनीच्या आहेत. जानेवारी पासून या बसेस एसटीच्या ताफ्यात दिसेल. तसेच भाडेतत्त्वावरील १ हजार ३१० बसेस पुढील तीन महिन्यांमध्ये एसटीच्या सेवेत येतील. केवळ बसेसचे लूकच नव्हे तर बसस्थानकांचाही चेहरामोहरा बदलवायचा आहे. बीओटी तत्वावर काही कामे करायची आहे. प्रवाशांना चांगल्यात चांगली सेवा देण्यासाठी खर्च येणार आहे. त्यामुळेच महामंडळाकडून १४.९५ टक्के प्रवासभाडे वाढविण्याचा प्रस्ताव शासनाला दिल्याचे गोगवले म्हणाले. अधिकाऱ्यांकडे विचारणाउपराजधानीच्या हृदयस्थळी एसटीच्या मालकीची अडीच-तीन एकर जागा, ज्यावर मोरभवन स्थानक आहे, त्याच्या अवस्थेकडे पत्रकारांनी गोगवले यांचे लक्ष वेधले. गोगवले यांनी एसटीचे उपाध्यक्ष माधव कुसेकर यांना लगेच त्याबाबत विचारणा केली. त्यानंतर गणेशपेठ, मोरभवन बसस्थानकाची कायापालट करण्यासाठी आवश्यक ते सर्व केले जाईल, असे गोगावले म्हणाले.
कर्मचाऱ्यांचे ३ हजार, ७५ कोटी थकितएसटीच्या कर्मचाऱ्यांचे ३ हजार, ७५ कोटी रुपये महांंडळाकडे थकित आहेत. ते लवकरच त्यांना परत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही गोगवले यांनी सांगितले. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर, नागपूर विभागाचे व्यवस्थापक श्रीकांत गभणे, मोनिका वानखेडे तसेच विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.