ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. १४ - लातूर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. बुधवारी सकाळी ८ वा़ पर्यंत जिल्ह्यात सरासरी ६६.८० मिमी पाऊस झाला़ निलंगा तालुक्यात तर १०२ मिमी पाऊस झाल्याने हाडगा- उमरगा रस्त्यावरील दोन्ही ओढे वाहू लागल्याने वाहतूक चार तास ठप्प झाली होती़.
निलंगा तालुक्यातील मसलगा परिसरातील पिके या पावसामुळे पाण्याखाली गेली असून काही घरांना भेगा पडल्या आहेत. कासारशिरसी परिसरात असलेला बडूर मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे़ तसेच उस्तुरी परिसरातील ओढे- नाले भरुन वाहत आहेत़ लातूर शहरानजीक असलेल्या साई व नागझरी बॅरेजेसमध्ये १० से़मी़ ने पाण्याची वाढ झाली आहे़ ३४५ मीटरवर पाणीपातळी आली आहे.
पाण्याचा फ्लो वाढत आहे़ यामुळे लातूर शहराच्या पाणीपुरवठ्याला मदत होणार आहे़ या दोन प्रकल्पातूनच सध्या पाणीपुरवठा सुरु आहे़ तसेच मांजरा प्रकल्प क्षेत्रातही मंगळवारी रात्री पाऊस झाला असून ४ से. मी. ने पाण्याची पातळी वाढली आहे़.
लातूर जिल्ह्यात मंगळवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते़ अधून-मधून रिमझिम पाऊस झाला़ रात्री १० वा़ नंतर मोठ्या पावसाला सुरुवात झाली़ लातूर तालुक्यात सकाळी ८ वा़ पर्यंत ३८.६३, औसा तालुक्यात ५७.४३, रेणापूर तालुक्यात ४८.५०, उदगीरमध्ये ५९.८६, अहमदपुरात ७७.३३, चाकूरमध्ये ९०़००, जळकोटमध्ये ५५.५०, निलंगा तालुक्यात १०२, देवणीत ५२.६७ आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यात ९१.६७ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे़ जिल्ह्यात सरासरी ६६.८० मिमी पाऊस झाला आहे.
पिकांना जीवदान
दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झाल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले आहे़ बाजरी, सोयाबीन, तूर, हायब्रीड ज्वारी आदी पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे़ सोयाबीन सध्या फुलोºयात असून पावसाने ताण दिल्यामुळे त्याची वाढ खुंटत होती. परंतु, मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़