"कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता रजा अकादमीविरोधात कठोर कारवाई करावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 06:53 PM2021-11-13T18:53:24+5:302021-11-13T18:53:24+5:30

आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Strict action should be taken against Reza Academy without succumbing to any political pressure cm uddhav thackeray | "कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता रजा अकादमीविरोधात कठोर कारवाई करावी"

"कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता रजा अकादमीविरोधात कठोर कारवाई करावी"

Next

"मुंबई-त्रिपुरा येथे एका धार्मिक स्थळावर हल्ला करण्यात आल्याची अफवा पसरवून व त्यातून अल्पसंख्याक तरुणांची माथी भडकवून काल महाराष्ट्रात हिसंक दंगली घडविण्याचे काम रजा अकादमीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. पोलिसांवर हल्ले करून त्यांना गंभीर जखमी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. अशाप्रकारची देश व समाजविरोधी कृत्य करणाऱ्या व धर्मांध प्रवृतींना खतपाणी घालणाऱ्या रजा अकादमीच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी व या रजा अकादमीवर कायमची बंदी घालण्याची शिफारस राज्य सरकारच्यावतीने केंद्र सरकारकडे करावी," अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

"महाराष्ट्रात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहात असताना दरवर्षी अशा पद्धतीने धार्मिक दंगल घडविण्याचे काम रजा अकादमी कडून सातत्याने करण्यात येत आहे. ऑगस्ट २०१२ मध्ये सुद्धा याच रजा अकादमीने मुंबईत मोर्चा दरम्यान संपूर्ण देशाच्या अस्मितेचा विषय असलेल्या अमर जवान स्मारकाची तोडफोड केली होती, इतकेच नव्हे तर महिला पोलिसांचे कपडे फाडण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार त्यांनी केला होता," असंही भातखळकर म्हणाले.


"मागील वर्षी कोरोनाच्या काळात फ्रान्स मधील कथित अल्पसंख्याक विरोधी कायद्याच्या विरोधात मुंबईच्या अनेक भागात आंदोलन करत दंगल भडकविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राज्यात अशा औरंगजेबी प्रवृत्तीना वेळीच ठेचणे गरजेचे आहे, त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपण रजा अकादमीच्या विरोधात कठोर कारवाई करावी," अशी मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेने  २०१२ मध्ये झालेल्या दंगलीच्या वेळी रजा अकादमीवर बंदी घालण्याची आग्रही मागणी केली होती, याची आठवण सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी करून दिली.

Web Title: Strict action should be taken against Reza Academy without succumbing to any political pressure cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.