राज्यात गुरुवारी २९ महापालिकांसाठी काही किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. धुळे येथे ईव्हीएम मशीनवरून रणकंदन झाले. चंद्रपूर आणि पुण्यातही ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया खोळंबली होती. नाशकात पैसे वाटपाच्या संशयावरुन हाणामारी झाली. काही ठिकाणी किरकोळ मारहाणीच्या घटना घडल्या मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने राडा टळला.
खासदार-निरीक्षकांत वाद
सकाळी मतदानास सुरुवात होताच खासदार संजय जाधव व निवडणूक निरीक्षक मेघना कवाली यांच्यात शाब्दिक वाद झाला. तर दोन प्रभागांत उमेदवारांमध्ये बाचाबाचीच्या घटना घडल्या. खा. जाधव हे मतदानासाठी माणसे घेऊन आल्याची तक्रार मेघना कवाली यांनी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याकडे केल्याचे समजताच जाधव संतापले आणि त्यांनी कवाली यांना सुनावले.
जळगावात बोगस मतदानाच्या संशयावरून तरुणाला मारहाण!
प्रभाग क्रमांक ५ मध्ये बोगस मतदानाच्या संशयावरून एका तरुणाला मतदान केंद्रावरच मारहाण करण्यात आल्याने आर.आर. शाळेच्या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
चंद्रपुरात हाणामारी
एकोरी प्रभागातील नेहरू शाळा केंद्रासमोर उद्धवसेना व अपक्ष समर्थकांत हाणामारी झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. वडगाव प्रभागातील खोली क्र. १ व महाकाली प्रभागातील सुमित्रानंतर कॉन्व्हेंटमध्ये ईव्हीएम बिघडल्याने मतदान ठप्प झाले. एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागांत गेल्याने हिस्लॉप कॉलेज, विठ्ठल मंदिर परिसरात गोंधळ झाला.
धुळ्यात ईव्हीएमची तोडफोड
प्रभाग १८ मधील मतदान केंद्रावर शिंदेसेनेचे उमेदवार सतीश महाले आणि विरोधी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यात जमावाने मतदान केंद्रात शिरून ईव्हीएम फोडले.
कसब्यात मतदारांचा गोंधळ
प्रभाग क्रमांक २५, शुक्रवार पेठ येथील शिवाजी मराठा हायस्कूलमधील मतदान केंद्रावरील खोली क्रमांक ४ मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया सुमारे दीड तास ठप्प झाली. दुपारी २:३० वाजता हा प्रकार घडल्याने मतदानासाठी आलेल्या मतदारांमध्ये मोठा गोंधळ उडाला. ईव्हीएमची तपासणी करून तांत्रिक अडचण दूर केल्यानंतर ३.४५ वाजता मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाली.
Web Summary : Voting marred by EVM issues in Dhule, Chandrapur, and Pune. Clashes and disruptions occurred, including vandalism of EVMs in Dhule. Polling resumed after repairs.
Web Summary : धुले, चंद्रपुर और पुणे में ईवीएम की खराबी से मतदान बाधित। धुले में ईवीएम में तोड़फोड़, झड़पें हुईं। मरम्मत के बाद मतदान फिर से शुरू हुआ।