मुख्यमंत्री फडणवीस : हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याचे संकेतनागपूर : बहुमताचा ‘मॅजिक फिगर’ मिळविण्यासाठी एकीकडे शिवसेनेसोबत चर्चा सुरू असताना भाजपाची वेगळ्या विदर्भाबाबत पक्षाची भूमिका काय असेल, यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतु वेगळ्या विदर्भाबाबत भाजप अजूनही आग्रही असल्याची बाब खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. शिवाय पाठिंब्यासंदर्भात शिवसेनेसोबत योग्य दिशेने चर्चा सुरू असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी वरील भूमिका मांडली. छोट्या राज्यांच्या निर्मितीसाठी भाजपाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ही आमची तात्विक भूमिका आहे. महाराष्ट्रात आमची सत्ता आली असली तरी आम्ही त्यावर अजूनही कायम आहोत. वेगळ्या विदर्भाची निर्मिती कधी करायची, याचा निर्णय केंद्रातील श्रेष्ठी करतील. ती कधी होईल, हे मी सांगू शकत नसलो तरी राज्याच्या निर्मितीची पद्धत मात्र स्पष्ट आहे. तेलंगणा नव्हे तर छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड या राज्यांच्या धर्तीवर विदर्भ राज्य तयार होईल. महाराष्ट्र अन् विदर्भ या दोन्ही राज्यांचा विकास झाला पाहिजे यावर भर देण्यात येईल, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भाबाबत भाजप अजूनही आग्रही असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय विदर्भातील समस्या मार्गी लागाव्यात याकरिता मंत्रालयात विशेष पाठपुरावा यंत्रणा उभारण्यात येईल, अशी घोषणादेखील त्यांनी केली. प्रत्येक विभागातील आवश्यक व अत्यंत महत्त्वाचे मुद्दे विभागीय अधिकाऱ्यांकडून पाठविण्यात आल्यानंतर या यंत्रणेच्या माध्यमातून ठराविक कालावधीने त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. यामुळे प्रलंबित मुद्दे मार्गी लागण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, सचिव अनुपम सोनी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, सरचिटणीस शिरीष बोरकर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.खडसेंची नाराजी असण्याचे कारणच नाहीराज्यात भाजपची सत्ता आली, याचा आनंद आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री बहुजन समाजाचे असायला हवे होते, असे विधान महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केले होते. खडसेंच्या विधानावर मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता मी खडसेंचे वक्तव्य ऐकलेलेच नाही; शिवाय त्यांनीच मुख्यमंत्रिपदासाठी माझे नाव समोर केले. त्यामुळे त्यांची नाराजी असण्याचे कारणच नाही. या मुद्यावर मी जास्त बोलणे योग्य नाही, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.अधिवेशनाचा कालावधी वाढणार?नागपुरातील हिवाळी अधिवेशन म्हणजे आमदारांची व मंत्रालयातील अधिकाऱ्यांची हिवाळी सहल, अशी टीका करण्यात येते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता, यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याचे त्यांनी संकेत दिले. अधिवेशन चार आठवड्यांचे होईल की नाही, हे सांगता येणार नाही. परंतु कार्यक्रमपत्रिकेतील शेवटची बाब पूर्ण होईपर्यंत अधिवेशन चालेल याची ग्वाही देतो, असे त्यांनी सांगितले. नागपुरात मिनी मंत्रालय स्थापन करण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. राज्य सरकार पूर्णपणे ‘ई-प्लॅटफॉर्म’वर येईल तेव्हाच मिनी मंत्रालयाची संकल्पना राबविणे शक्य होईल. यासंदर्भात लवकरच राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करू, अशी माहिती त्यांनी दिली.जवखेडा प्रकरणात कडक कारवाई होणारअहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथील दलित कुटुंबीयाच्या हत्येच्याप्रकरणी यासंदर्भात पोलीस महासंचालकांशीदेखील चर्चा केली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून कोणाचाही मुलाहिजा बाळगू नका व लवकरात लवकर प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आरोपींचा छडा लावा, असे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ‘बेळगावी’ नाव मान्यच नाहीकर्नाटक सरकारने राज्य मराठी भाषिकांच्या भावनांचा विचार न करता १२ शहरांची नावे बदलली. बेळगावचे ‘बेळगावी’ हे नामकरण चुकीचेच आहे. राज्य शासनाला हे नाव मान्यच नाही, असे परखड मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. सीमाप्रश्नासंदर्भात आजवर कर्नाटकने जास्त आक्रमकपणे बाजू मांडली आहे. महाराष्ट्रालादेखील आता तशी भूमिका घ्यावी लागेल व याबाबत सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडणार, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.पत्रकारांच्या समस्यांकडे लक्ष देणारपत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांचा मुद्दा गंभीर असून, पत्रकार हल्ला विरोधी कायद्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. देशातील काही राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील पत्रकारांनादेखील ‘पेन्शन योजना’ सुरू करण्याबाबत मी स्वत: पुढाकार घेईल, असेदेखील ते म्हणाले.क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र मागे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात मागे असल्याची खंत नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्य सरकार याची गंभीर दखल घेत पावले उचलणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. हे सरकार राज्यात खेळाच्या विकासासाठी गंभीरपणे काम करणार असल्यामुळेच मी विनोद तावडे यांच्यासारख्या सहकाऱ्याला क्रीडा खाते दिले. त्यांच्याकडे शिक्षण खातेदेखील असल्यामुळे शिक्षण आणि क्रीडा यांची योग्य सांगड घालण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
वेगळ्या विदर्भासाठी अजूनही आग्रही
By admin | Updated: November 4, 2014 01:04 IST