अतुल कुलकर्णी,
मुंबई- राज्यातील ४ लाख विद्यार्थी एमएचटी-सीईटीला बसले असून, विद्यार्थ्यांचा अभ्यासही आता पूर्ण झाला आहे. अशावेळी बदल करणे अशक्य असल्यामुळे ५ मे रोजीची नियोजित सीईटी होणारच, असे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.‘नीट’मधून महाराष्ट्र राज्याला कायमस्वरूपी वगळावे आणि हे शक्य नसेल तर २०१८पासून राज्याला ही परीक्षा लागू करावी, म्हणजे मुलांना २ वर्षे तयारीसाठी मिळतात अशी भूमिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडली. मात्र, सीबीएससी आणि केंद्राने वेगळी भूमिका घेतल्याने न्यायालयाचा तो निर्णय आला आहे. आम्ही सोमवारी रिव्ह्यू पिटीशन दाखल करणार आहोत, विधि व न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आमचे बोलणे झाले असून, सर्वोत्तम वकील लावून न्यायालयासमोर भूमिका स्पष्ट केली जाईल, असे डॉ. शिनगारे यांनी सांगितले.