बुलडाणा : राष्ट्रमाता जिजाऊंच्या सिंदखेडराजाविषयी मला खूप आकर्षण होते. माझे वडील मला लहानपणी म्हणायचे की, मी तुला सिंदखेडराजामधून आमदार करीन. योगायोगाने बुलडाणा जिल्ह्याचे सासर मिळाले. माझ्या वडिलांनी मला धनसंपत्तीचा वारसा न देता समाजासाठी संघर्ष करण्याचा वारसा दिला आहे. हा संघर्ष जनतेच्या कल्याणाचा असून, त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हाच आपल्या जीवनाचा उद्देश आहे, अशा भावनिक शब्दांमध्ये पंकजा मुंडे-पालवे यांनी गुरुवारी संघर्ष यात्रेचा प्रारंभ केला.सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करून आज ह्यपुन्हा संघर्षह्ण यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगितल्याने सभा भावुक झाली. वडिलांच्या जाण्याचे दु:ख जितके मला आहे, तितकेच समाजाला झाले; मात्र या दु:खात राहण्यापेक्षा त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी बाहेर पडली आहे. त्यांच्या पश्चात समाजाला विश्वास देण्यासाठी, संघटित करण्यासाठी ही यात्रा काढली असून, आता संघटित व्हा आणि हे आघाडी सरकार उलथून टाका, असे आवाहन त्यांनी केले. वाढती गुन्हेगारी, विकासाचा अनुशेष, शेतकर्यांच्या आत्महत्या अशा अनेक आघाड्यांवर राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुंडे साहेबांच्या स्वप्नपूर्तीचे दिवस जवळ आले असून, आघाडी सरकारला एकएक मताचा दुष्काळ पडेल, अशी परिस्थिती निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.भाजप प्रदेशाध्यक्ष दवेंद्र फडणवीस यांनीही आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. शेतकर्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, शेतकर्यांसाठी आलेल्या पॅकेजमध्ये भ्रष्टाचार होतो, लाखो कोटींचा सिंचन घोटाळा उघड होतो. या सर्व प्रकारांना लोक कंटाळले असून, महायुतीच्या पाठीशी राहा व हे सरकार उलथून टाका, असे ते म्हणाले. भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर यांनी मुंडे यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेची आठवण सांगत, इतिहासाची पुनरावृत्ती होऊन महायुतीची सत्ता येईल, असा आशावाद व्यक्त केला. आ.चैनसुख संचेती यांनी शेरोशायरी सादर करून संघर्ष यात्रेला यश मिळेल व सत्तांतर होईल, असा दावा केला. यात्रेचे समन्वयक सुजीतसिंह ठाकूर यांनी संघर्षयात्रेची पृष्ठभूमी विषद केली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ.संजय कुटे यांनी प्रास्ताविकामध्ये संघर्ष यात्रेची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सभेचे संचालनही केले.
भावुक वातावरणात संघर्ष यात्रेचा प्रारंभ
By admin | Updated: August 28, 2014 23:42 IST