Pratap Sarnaik News: दरवर्षी विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार असल्यास माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एस टी महामंडळाच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला एस. टी. महामंडळाचे पदाधिकारी तसेच एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, वर्षातील २६० दिवस विना अपघात सेवा बजवणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे या राष्ट्रीय सणा दिवशी सत्कार करण्यात येणार आहे. याबरोबरच पाच वर्षे, दहा वर्षे, पंधरा वर्षे ,वीस वर्षे विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा तितकीच रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येणार आहे. एसटी महामंडळ गेली ७७ वर्षे महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला किफायतशीर व सुरक्षित प्रवासी दळणवळणाचे सेवा देत आहे. अपघाताचे अत्यंत अल्प प्रमाण आणि किफायतशीर सेवा यामुळे एसटीने प्रवाशांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे. भविष्यात देखील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा वेळोवेळी गौरव केला तर निश्चितच ते सजगपणे आणि जबाबदारीने प्रवासी वाहतूक करतील, अशी आशा प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.
२०४ बसस्थानकावर एटीएम सुविधा
बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्यातील २०४ बस स्थानकावर एटीएम केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्याबद्दलची निविदा लवकरच प्रसारित करण्यात येत असून राष्ट्रीयकृत बँकेबरोबरच अन्य बॅंकांची एटीएम सुविधा देखील बसस्थानकावर उपलब्ध होणार आहे.
नवीन लालपरी मध्ये ३ बाय २ आसन व्यवस्था नव्या ३ हजार बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रियेला या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिली. तथापि, या बसेस मध्ये पूर्वीप्रमाणे ३ बाय २ प्रकारची आसन व्यवस्था राहणार आहे. अर्थात,आत्ताच बस पेक्षा तब्बल १५ ते १७ प्रवासी नव्या बसमध्ये बसून प्रवास करतील.
१०० मिनी बसेस घेणार
नव्या बस खरेदीमध्ये १०० मिनी बसेस घेण्यात येणार असून, त्या बसेस प्रामुख्याने डोंगराळ, दुर्गम भागामध्ये जिथे सध्याची लालपरी पोहचू शकत नाही, तेथे चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे अतिशय दुर्गम भागातील आदिवासी पाड्यापर्यंत बस सेवा पुरवण्यात महामंडळ सक्षम होईल. लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी कटीबद्ध राहणार आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.