मुंबई : एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करणार आहे तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बस न घेण्याचा निर्णयही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला.
परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेणारी बैठक मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. सरनाईक म्हणाले, नवीन बस खरेदी करताना पुढील पाच वर्षांत स्क्रॅपिंग होणाऱ्या बसचा विचार करण्यात यावा. याबाबत सर्वांगीण अभ्यास करून पंचवार्षिक योजना आणावी. एसटी महामंडळात इलेक्ट्रिक बस घेण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग स्टेशन प्राधान्याने उभारावे. महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणाव्यात.
कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत देण्याची काळजी घ्यावी. पगाराला उशीर होता कामा नये. शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. डिझेलवरील व्हॅटमध्ये सवलत देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा. महामंडळाच्या प्रत्येक डेपोमध्ये डिझेल पंप आहे. त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोनातून उपयोगी ठरतील असे डिझेल पंप सुरू करून उत्पन्न वाढीसाठी पर्याय निर्माण करण्यात यावा. याबाबत इंधन कंपन्यांशी करार करावा, असेही त्यांनी सांगितले.
नवीन जाहिरात धोरण आणणार महामंडळाने नवीन जाहिरात धोरण आणावे. नवीन येणाऱ्या बसवर दोन्ही बाजूला आणि मागील बाजूस अशा तीनही बाजूंना डिजिटल जाहिरातीची व्यवस्था असावी. जाहिरात धोरणासाठी अन्य बाबी तपासून त्यातून मिळणारे उत्पन्न १०० कोटीपर्यंत आणण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात यावे. महामंडळाच्या बसला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर टोल माफी मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, असेही सरनाईक यांनी सांगितले.