मुंबई : भाजपा खासदार किरिट सोमय्या यांनी मुलुंडच्या राहुलनगर परिसरातील मतदारांना पैसे आणि साड्यावाटपाच्या सोशल मीडियावर सोडलेल्या वृत्ताने राजकीय पक्षांतील वाद चिघळला आहे. याच प्रकरणावर भाष्य केल्याने सोमय्या यांचे माजी सचिव यांनी धमकाविल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंपर्क प्रमुखांनी केला आहे. या तक्रार अर्जावरून भोईवाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.मुलुंडच्या प्रभाग क्रमांक १०८मधून भाजपाचे उमेदवार आणि सोमय्या यांचे पुत्र नील हे प्रभागात पैसे व साड्यावाटप करीत असल्याच्या संशयातून हा वाद पेटला. शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही यामध्ये उडी घेत हल्लाबोल केला. हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर गाडीत काहीच आढळले नसल्याचे सांगून पोलिसांनी यावर पडदा टाकला. मात्र या प्रकरणातील काही व्हिडीओ क्लिप असल्याचा दावा विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी केला आहे. त्या दिशेनेही मुलुंड निवडणूक अधिकारी अधिक तपास करीत आहेत. मात्र रात्री ही चर्चा रंगली असतानाच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांना धमकीचा मेसेज आल्याने या राड्यात आणखी भर पडत हा वाद पुन्हा सुरू झाला आहे. प्रधान यांच्या तक्रार अर्जानुसार, गुरुवारी सोमय्यांच्या पैसेवाटपाचे वृत्त चर्चेत येताच, त्यांनीही या प्रकरणी अलर्ट सिटिझन आॅफ फोरम या ग्रुपवर याबाबत ‘प्लीज चेक’ असा मेसेज करून पैसेवाटपाचा मजकूर पाठविला.’हा मेसेज सोमय्यांचे माजी सचिव दयानंद नेने यांनी वाचताच, त्यांनी ‘मरेंगे या मारेंगे’ असा मेसेज पाठवून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप प्रधान यांनी केला आहे. हे प्रकरण भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने प्रधान यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.
सोमय्या पैसेवाटप प्रकरणाचा वाद शिगेला
By admin | Updated: February 18, 2017 04:35 IST