मुंबई : सहा महिन्यांपूर्वी कॉमेडी शो कलाकार कपिल शर्मा याने केलेल्या वादग्रस्त टिष्ट्वटनंतर वर्सोवा येथील आरामनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र, आता पुन्हा या परिसरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने यातील ५४ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केल्याचा दावा केला आहे.कपिल शर्मा यांच्या त्या वादग्रस्त टिष्ट्वटनंतर महापालिकेने त्याच्या कारवायांची दखल घेतली होती, पण त्याच्याप्रमाणेच चित्रपटसृष्टीतील अन्य बाराहून अधिक जणांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांकडे डोळेझाक करण्यात आली. आता कपिल शर्माला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर, पुन्हा या परिसरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे.गेल्या फेब्रुवारी महिन्यात आरामनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींमध्ये प्रत्येक अनधिकृत बांधकामाचा तपशील देण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना विचारणा केली असता, त्यांनी या संदर्भात आतापर्यंत ५४ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे सांगितले. तिवरांची कत्तल करणे, तसेच अनधिकृत बांधकाम करणे असे गुन्हे त्यांच्याविरुद्ध दाखल आहेत.कपिल शर्माच्या वादग्रस्त टिष्ट्वटनंतर मुंबई महापालिकेने त्याच्याविरुद्ध तिलर नष्ट करणे, तसेच अनधिकृत बांधकाम केल्याचा गुन्हा दाखल केला होता. कपिल शर्माविरुद्धच्या कारवाईमुळे त्याच्याशेजारी राहाणारे काही रहिवाशीही अशा कृत्यांमुळे अडचणीत आले. त्यांच्याविरुद्ध महापालिका, पोलीस, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने काहीच कारवाई केली नाही. जर समाजकंटक तिवरांची कत्तल करून अनधिकृत बांधकामे करत असतील, तरी सर्वांवरच कारवाई का केली जात नाही, असा सवाल केला जात आहे. (प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट
By admin | Updated: April 6, 2017 02:14 IST