सोलापूर - भाजपाचे शहर उपाध्यक्ष अनंत जाधव यांच्यानंतर चिटणीस श्रीकांत घाडगे यांनीही शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याचदरम्यान पक्षात विविध पदांवर सक्रिय असलेल्या ५० जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी बुधवारी शहर कार्यकारणी जाहीर केली होती. ही कार्यकारणी जाहीर होऊन दोन तास होत नाही, तोच उपाध्यक्षपदावर निवड झालेले अनंत जाधव यांनी पदाचा राजीनामा दिला. शहर कार्यकारणीच्या निवडीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता दोन दिवसांनी शुक्रवारी श्रीकांत घाडगे यांनी चिटणीसपदाचा राजीनामा दिला.
धनगर समाजातील प्रशांत फत्तेपूरकर, राम वाकसे, राज बंडगर ५० हून अधिक कार्यकर्त्यांची शुक्रवारी बैठक झाली. पक्षाच्या कार्यकारिणीत समाजातील व्यक्तींना विशेष स्थान देण्यात आलेले नाही. समाजावर अन्याय झालेला आहे, असे सांगत या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आपल्या नाराजीबाबत निवेदन दिले आहे. पक्षाचे अनेक जुने कार्यकर्ते सदस्यत्व सोडतील, असे राम वाकसे आणि राज बंडगर यांनी सांगितले.
भाजपातील अंतर्गत राजकारणाने नाराजीनाट्य
भाजपामधील अंतर्गत राजकारणामुळे नाराज असलेले आमदार विजयकुमार देशमुख यांची शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट घेतली. देशमुखांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत महापालिका निवडणूक आणि भाजपामधील विविध घडामोडींवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख विरुद्ध आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे या चार आमदारांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे.
भाजपची शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. या कार्यकारिणी निवडीवरून नाराजीचे सत्र सुरू आहे. सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी दुपारी आमदार विजयकुमार देशमुख यांना भेटीबाबत निरोप दिला होता. त्यानुसार शुक्रवारी दुपारी पालकमंत्र्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या काळजापूर मारुती मंदिराच्या शेजारील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पुन्हा महापालिकेत भाजपाची सत्ता यावी यासाठी सर्वांनी मिळून काम करायला हवे. मागील काळात घडलेल्या विविध घडामोडींबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. विशेष म्हणजे या नियोजित भेटीवेळी देशमुख गटाचे प्रमुख शिलेदार अनुपस्थित होते.