दहिवडी (जि. सातारा) : ‘रिओ आॅलिम्पिक’ स्पर्धेतील भारताची धावपटू अर्थात ‘सातारा एक्स्प्रेस’ ललिता बाबर हिला प्रोत्साहन देण्यासाठी रविवारी सकाळी तब्बल १६ हजार धावपटूंनी ‘माणदेश मॅरेथॉन’मध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला. ‘रन फॉर ललिता’साठी दहिवडीत दाखल झालेल्या हजारो मुला-मुलींचा उत्साह चकीत करणारा होता.ब्राझीलमध्ये होणाऱ्या ‘रिओ आॅलिम्पिक’ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या इवल्याशा मोही गावातील ललिता बाबर कसून सराव करत आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणारी ललिता आता माणदेशापुरती राहिली नसून, संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता बनली आहे. म्हणूनच या ‘सातारा एक्स्प्रेस’ला प्रोत्साहन देण्यासाठी ‘रन फॉर ललिता’ हे घोषवाक्य घेऊन ‘माणदेश मॅरेथॉन २०१६’चे आयोजन करण्यात आले होते. दहिवडी येथील कर्मवीर चौकापासून मॅरेथॉनला प्रारंभ झाला. या वेळी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, तसेच सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे अन् काँग्रेसचे आमदार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)रिओ आॅलिंम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेली माणदेश कन्या सातारा एक्स्प्रेस ललिता बाबर हिला प्रोत्साहन देण्यासाठी रविवारी माण तालुक्यातील दहिवडी येथे माणदेश मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत राज्यभरातून सोळा हजार धावपटू सहभागी झाले होते.एक लाखाची मदत : ललिता बाबर हिला मदत म्हणून तिचे वडील शिवाजी बाबर तसेच आई यांच्याकडे एक लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेशही महादेव जानकर यांनी या वेळी सुपूर्द केला.
ललितासाठी धावले सोळा हजार धावपटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 04:27 IST