शीलेश शर्मा,नवी दिल्लीमहाराष्ट्रात चंद्रपूर आणि गोंदियासह सहा नवीन मेडिकल कॉलेज (वैद्यकीय महाविद्यालय) स्थापन करण्याच्या प्रक्रियेला पूर्णविराम देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयाविरुद्ध कंबर कसण्याचे काँग्रेसचे ठरविले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी खुद्द हा मुद्दा केंद्रासमक्ष उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वीच्या काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने राज्यातील चंद्रपूर,गोंदिया,अलिबाग, नंदूरबार, बारामती आणि सातारा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु विद्यमान मोदी सरकारने हा निर्णय रद्द केला आहे. यामुळे नाराज काँग्रेस अध्यक्षांनी आता हा मुद्दा उचलून धरण्याचे ठरविले आहे.चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सोनिया यांधी यांना यासंदर्भात पत्र पाठवून हस्तक्षेपाची मागणी केली होती. याशिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून आरोग्य मंत्र्यांनी वस्तुस्थिती जाणून न घेता या वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी नाकारण्याचे फर्मान कसे काढले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. भाजपाच्या नेतृत्वातील राज्य सरकारने हेतूपुरस्सर या सहा वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी न देण्याचा निर्णय घेऊन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून यावर शिक्कामोर्तब करवून घेतले,असा आरोप पुगलिया यांनी या पत्रात केला होता. मोदी सरकारने अमेठीतील फूडपार्क ज्या पद्धतीने रद्द केला नेमका तोच प्रकार महाविद्यालयांबाबतही घडला. मोदी सरकारचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे काँग्रेसला वाटत आहे. महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालये उघडण्याचे श्रेय काँग्रेसला मिळू नये यासाठी मोदी सरकारचा हा खटाटोप आहे,असेही काँग्रेसचे म्हणणे आहे.
राज्यातील सहा नवी वैद्यकीय महाविद्यालये रद्द
By admin | Updated: June 21, 2015 01:32 IST