महाराष्ट्राला दिले सहाच मंत्री

By Admin | Updated: May 27, 2014 06:20 IST2014-05-27T06:20:27+5:302014-05-27T06:20:27+5:30

भाजपा-शिवसेना महायुतीला लोकसभेच्या ४८ पैकी तब्बल ४२ जागा जिंकून देणार्‍या महाराष्ट्राला नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात सोमवारी अपेक्षित स्थान मिळाले नाही.

Six Ministers given to Maharashtra | महाराष्ट्राला दिले सहाच मंत्री

महाराष्ट्राला दिले सहाच मंत्री

नवी दिल्ली : भाजपा-शिवसेना महायुतीला लोकसभेच्या ४८ पैकी तब्बल ४२ जागा जिंकून देणार्‍या महाराष्ट्राला नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात सोमवारी अपेक्षित स्थान मिळाले नाही. केवळ सहा जणांची वर्णी लागली. शिवसेनेला तूर्त एका मंत्रिपदावर समाधान मानावे लागले. भाजपाचे दिग्गज नेते माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, दुसरे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य अनंत गीते कॅबिनेट मंत्री झाले आहेत. गडकरी, मुंडे पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री झाले तर गीते यांची ही दुसरी वेळ आहे, यापूर्वी वाजपेयी सरकारमध्ये ते होते. प्रकाश जावडेकर आणि पीयूष गोयल यांना राज्यमंत्रीपद (स्वतंत्र कार्यभार) मिळाले. जावडेकर यांचा समावेश स्वत: नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकारात केल्याचे म्हटले जाते. गोयल यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या नियोजनात मोलाची भूमिका निभावली होती. भाजपाचे ते राष्ट्रीय कोषाध्यक्ष आहेत. निष्ठावान कार्यकर्ते ते चार वेळचे खासदार असा प्रवास केलेले रावसाहेब दानवे यांना राज्यमंत्रीपद मिळाले. आम्हाला कमी प्रतिनिधीत्व मिळालेले आहे. मात्र, विस्तारामध्ये ते नक्कीच वाढवून मिळणार आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतला सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Six Ministers given to Maharashtra