मुंबई : बोगस कागदपत्रे तयार करून त्याआधारे विविध कंपन्यांकडून सिमकार्ड घेऊन ती विकणाऱ्या शरीफ खान (२६) या डीलरला ट्रॉम्बे पोलिसांनी चिता कॅम्प येथून गजाआड केले. त्याच्याकडून तब्बल २१७३ सिमकार्ड सापडली. त्यापैकी १७७७ कार्ड रिलायन्स व टाटा डोकोमो या कंपन्यांची असून ती अॅक्टिव्हेटेड असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली.याहून धक्कादायक बाब म्हणजे शरीफ हा गेल्या अनेक दिवसांपासून इंटरनेट व सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानसह बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया, नायजेरिया, म्यानमार, ट्युनिशिया या देशांमधील अज्ञात व्यक्तींसोबत चॅट करत होता. ही माहिती समोर येताच ट्रॉम्बे पोलीस ठाण्याने प्रकरण गांभीर्याने हाताळून सर्वप्रथम आपल्या वरिष्ठांना ही बाब कळवली. ट्रॉम्बे चिता कॅम्पमधील एक किरकोळ सिमकार्ड डीलर या सात देशांमधील अज्ञात व्यक्तींशी कशासाठी संपर्कात होता, तो त्यांच्याशी काय चर्चा करत होता, शरीफ दहशतवाद्यांच्या संपर्कात तर नव्हता हे जाणून घेण्यासाठी, या बाबी पडताळण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी एक विशेष पथक स्थापन केले आहे. शरीफचे गूढ उकलण्यासाठी राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस), मुंबई क्राइम ब्रांच, सायबर सेल, न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ व अनुभवी अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अन्सार पिरजादे, एपीआय वैजनाथ उपासे यांना त्यांच्या खबऱ्याने शरीफने सुरू केलेल्या गौडबंगालाची माहिती दिली. ही माहिती मिळताच उपासे व पथकाने शरीफवर पाळत ठेवली. त्याची संपूर्ण माहिती मिळवून चौकशीसाठी ताब्यात घेतले. घराची झाडाझडती घेतली. त्यातून २१७३ सिमकार्डांसोबत असंख्य बोगस आधार कार्ड व मतदान ओळखपत्रे सापडली. शरीफ तूर्तास पोलीस कोठडीत असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)
सिमकार्ड डीलर गजाआड
By admin | Updated: January 31, 2015 05:25 IST