मुंबई : गेल्या काही दिवसांपासून होमिओपॅथी विरुद्ध ॲलोपथी डॉक्टरांचा वाद राज्यात रंगताना पाहायला मिळत आहे. होमिओपॅथी डॉक्टरांनी फार्माकॉलॉजी या विषयाचा एक वर्षाचा कोर्स केल्यानंतर त्याची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या निर्णयास इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. हा वाद थेट मुख्यमंत्री दरबारी पोहोचल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने दोन्ही शाखांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त केली आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने नोंदवला आक्षेपहोमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांसाठी आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) सुरू करण्यास ऑगस्ट २०१४ रोजी मान्यता देण्यात आलेली आहे. हा अभ्यासक्रम उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना आधुनिक शास्त्रीय वैद्यक पद्धतीने व्यवसाय करण्यास पात्र ठरविण्यात आले आहे. अशा महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडे नोंदणीकृत अर्हताधारक वैद्यकीय व्यावसायिकांचे स्वतंत्र नोंदणी पुस्तक ठेवणे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी आवश्यक आहे. याबाबत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला शासनाने एप्रिलमध्ये निर्देश दिले होते.
आता यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य या संघटनेने मंगळवारी शासनास निवेदन देत या धोरणाला आक्षेप घेतला आहे. त्यामध्ये होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांना आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये व्यवसाय करण्यास परवानगी दिल्यास लोकांच्या आरोग्यास व रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदमध्ये या व्यावसायिकांना नोंदणी देण्यास थांबविण्याबाबतची विनंती करण्यात आली होती. त्याचा अभ्यास करण्यासाठी दोन्ही चिकित्सा क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून अहवाल सादर करण्याकरिता अभ्यास समिती नियुक्त करण्यात आली आहे. हा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
या समितीत कोण?अध्यक्ष - आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष संचालनालयसदस्य - प्र-कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, संचालक - वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, संचालक - आयुष संचालनालय, प्रबंधक - महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, प्रबंधक - महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी परिषद, सदस्य सचिव - प्रबंधक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक)