प्रवीण देसाई, रायगडछत्रपती शिवाजी महाराज यांचा अखंड जयघोष, पारंपरिक वाद्यांचा गजर, आकाशात भिरभिरणारे भगवे ध्वज आणि शिवभक्तांचा जनसागर अशा उत्साही वातावरणात रविवारी रायगडावर शिवराज्याभिषेक महोत्सवास प्रारंभ झाला. आज, सोमवारी मुख्य सोहळा सकाळी १० वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिवछत्रपतींच्या उत्सवमूर्तीवर अभिषेक करून होणार आहे. या वेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, कामगारमंत्री प्रकाश महेता, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील, आमदार नीतेश राणे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी गडकिल्ल्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवर मुख्यमंत्री फडणवीस या सोहळ्यात काय घोषणा करतात, याकडे शिवभक्तांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. हजारो शिवभक्त-इतिहासप्रेमी आणि पर्यटक शनिवारपासूनच रायगडावर दाखल झाले आहेत. रविवारी सायंकाळी गडपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांच्या हस्ते गडपूजन झाले. यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत साळोखे, सचिव प्रवीण हुबाळे, संजय पवार, नगरसेवक सचिन पाटील, विनायक फाळके, राहुल पापळ (पुणे), इतिहास अभ्यासक राम यादव, कोल्हापूर पुराभिलेखागार विभागाचे गणेशकुमार खोडके, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा!
By admin | Updated: June 6, 2016 03:29 IST