ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 21 - शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान तैनात असलेल्या एका पोलिसाची कॉलर पकडून दमदाटी करत शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेदरम्यान तीन वाजण्याआधीच सभागृहाचे दार बंद केल्याचा आरोप करत खासदार चंद्रकांत खैरे यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्याठिकाणी तैनात असलेल्या एका पोलिसाला दमदाटी केली. तसेच, त्या पोलिसाला शिवीगाळ सुद्धा केली. अखेर संतापले खासदार चंद्रकांत खैरे पाहून पोलिसाने दरवाजा उघडला. त्यानंतर शिवसेना सदस्य सभागृहात पोहचले. पोलिसांना हाती धरून शिवसेना सदस्यांना मतदानापासून रोखायचं अशी भाजपची चाल होती. असा आरोप यावेळी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.
दरम्यान, याआधीही खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद येथील बेकायदा धार्मिक स्थळावर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदाराला शिवीगाळ करून आणि धमकावून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.