बदलापूर : येथील प्रभाग क्रमांक १७मधील शिवसेना उमेदवाराचे जातवैधता प्रमाणपत्र असतानाही ते प्रमाणपत्र योग्य नसल्याचे कारण देत त्यांचा अर्ज फेटाळला गेला. निवडणूक अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. बदलापुरातील प्रभाग क्रमांक १७मध्ये शिवसेनेच्या वतीने नूतन चंद्रकांत पिंगळे यांनी ओबीसी या आरक्षित जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर भाजपाच्या वतीने निशा घोरपडे यांचा अर्ज आला होता. या दोन उमेदवारांच्या अर्जांची छानणी करताना घोरपडे यांचा अर्ज वैध ठरला. मात्र, पिंगळे यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावर अधिकाऱ्यांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केले. पिंगळे यांचे वैधता प्रमाणपत्र उपजिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले होते. निवडणुकीसाठी जातपडताळणी समितीने दिलेले प्रमाणपत्रच ग्राह्य धरण्यात येणार असल्याची सबब अधिकाऱ्यांनी देत पिंगळे यांचा उमेदवारी अर्ज बाद केला. पिंगळे यांचा अर्ज बाद झाल्याने घोरपडे यांची या प्रभागातून बिनविरोध निवड करण्यात आली.
जातवैधताप्रकरणी शिवसेना जाणार न्यायालयात
By admin | Updated: April 4, 2015 04:32 IST