शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

लेखः 'ते' पवार विरुद्ध 'हे' पवार

By केशव उपाध्ये | Updated: May 25, 2022 16:38 IST

सदावर्ते, चितळे यांनी चूक केली आहे, गुन्हाही केला असेल पण त्यांच्याविरुद्ध अशा पद्धतीने अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे सत्र चालू करणे हा खुनशीपणा झाला, ही सूडबुद्धी झाली.

>> केशव उपाध्ये

महाराष्ट्रात अलीकडे साहेब हे विशेषण फक्त एकाच राजकीय नेत्याला अभिमानाने लावले जाते. त्यांचे नाव तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे, त्यामुळे ते सांगण्यात हशील नाही. तर या साहेबांविषयी समाजमाध्यमात अलीकडे प्रसारित झालेल्या मजकुरामुळे मोठे वादंग झाले. काहींवर गुन्हे दाखल झाले तर काहींना मारहाण झाली. साहेबांविषयी अग्रेषित केलेल्या मजकुराशी कोणीही सुसंस्कृत माणूस सहमत होणार नाही. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात सभ्यता, सुसंस्कृतता, उदारमतवाद जपण्याची असलेली परंपरा याविषयीही बरंच काही बोललं गेलं. यानिमित्ताने महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांतली वक्तव्ये, घटना यांचे स्मरण करून देणे क्रमप्राप्त आहे.

महाराष्ट्राच्या उदारमतवादी राजकीय परंपरेच्या गळ्याला नख लावण्याचे उद्योग कोणी आणि कसे केले याची यादी गेल्या काही वर्षांत कशी वाढली, याचाही लेखाजोखा घ्यावा लागणार आहे. पवारांचा १९६७ पासूनचा अनेक वळणे, बाह्यवळणे घेत झालेला प्रवास महाराष्ट्राने पाहिला आहे. या प्रवासात कितीही चढ - उतार आले तरी पवारांनी राज्याच्या राजकारणातले आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान परिश्रमाने राखले आहे, हे मान्य करावेच लागेल. पवार ज्यांना राजकारणातील गुरु मानत असत त्या यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणातील सभ्यता, उदारमतवाद, सुसंस्कृतता कशी जपली याचे अनेक दाखले ज्येष्ठ पत्रकार मंडळी देतात. पवारांनी याच परंपरेचे पालन केल्याचे काही दाखले पत्रकार जरूर देतात. उदा. १९९४ - ९५ च्या सुमारास गो. रा. खैरनार यांनी पवारांविरुद्ध आघाडी उघडली होती. खैरनार यांच्या मोहिमेला उत्तर देताना आपले समर्थक मर्यादा ओलांडून व्यक्तिगत पातळीवरील टीकेचा आश्रय घेत आहेत, असे लक्षात आल्यावर पवारांनी त्यांना आवरले होते.

याच पवारांचा दुसरा चेहरा महाराष्ट्राने अलीकडे पाहिला आहे. ९-१० वर्षांपूर्वीची घटना. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी केलेले आंदोलन दक्षिण महाराष्ट्रात चांगलेच पसरले होते. ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून आपला विरोध प्रकट करत होते. आंदोलनाने साखर कारखानदार कोंडीत सापडल्याचे चित्र दिसत होते. अशा वेळी ''हा कोण कुठला राजू शेट्टी? तो कोणत्या जातीचा आहे याबद्दल मला बोलायचे नाही. पण त्याच्या मतदारसंघातील ''वारणा''सारखे कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. वारणा कारखान्याचे कोरे आणि शेट्टी हे कोणत्या जातीचे आहेत ते पाहा. आपल्या घराभोवतीचे कारखाने आधी बंद कर मग राज्यभर हिंड,'' असे वक्तव्य पवारांनी केले होते. पवारांचे म्हणणे असे होते की, राजू शेट्टी आणि वारणा कारखान्याचे विनय कोरे हे एकाच समाजाचे आहेत. त्यामुळे शेट्टी हे कोरे यांचा वारणा कारखाना बंद पाडत नाहीत. मात्र राज्यभरातील कारखाने बंद पाडण्यासाठी ते हिंडत आहेत. पवारांच्या या वक्तव्यावरून अपेक्षेप्रमाणे गदारोळ माजला. पवार हे उस उत्पादकांमध्ये जातीच्या आधारावरून फूट पाडत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला. पवारांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटल्यावर पवार हे त्याबाबत काही तरी खुलासा करतील असे वाटले होते. पण पवारांनी त्याबाबत काहीच  खुलासा केलेला नाही अथवा 'माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला,' अशा थाटाचा बचाव केला नाही. 

पवार यांच्या या वक्तव्यातील सर्वात आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे त्यांनी शेट्टी यांच्या जातीचा केलेला उल्लेख. शेट्टी हे कोणत्याही जातीचे असले तरी त्यांना ऊस उत्पादक या नात्याने आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते एका विशिष्ट जातीचे आहेत म्हणून त्यांना उस उत्पादक शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्याचा अधिकार नाही, असे पवारांना सूचित करावयाचे होते. शेट्टी हे अल्पसंख्य जैन समाजाचे असूनही मराठा समाजाचे बहुसंख्य शेतकरी त्यांच्या मागे सर्वशक्तीनिशी उभे आहेत याचा पवारांना राग आला असावा आणि हा राग त्यांनी शेट्टींची जात काढून व्यक्त केला होता.

सहा वर्षांपूर्वी कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आल्यानंतर साहेबांनी 'पूर्वी छत्रपती पेशव्यांना नियुक्त करायचे आता पेशवे छत्रपतींना नियुक्त करू लागले आहेत' अशा प्रकारची टिपण्णी केली होती. ही टिपण्णी प्रच्छन्न जातीवादी होती. छत्रपती संभाजीराजेंची नियुक्ती भाजप सरकारने केली म्हणून पवारांना आलेला अतोनात संताप त्यांनी या प्रकारच्या टिपण्णीतून व्यक्त केला. 'आता ब्राह्मणशाही आली आहे' असेच पवारांना आपल्या टिपण्णीतून सूचित करायचे होते. पवारांच्या अशा वक्तव्यावर राज्यातील तमाम विचारवंत-पत्रकार मंडळींनी मौन बाळगणेच पसंत केले होते. १९९०, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जोशी-महाजनांना शेतीतलं काय कळणार, त्यांना भुईमूग कुठं उगवतो हे तरी माहिती आहे का, असे वक्तव्य याच पवारांनी केले होते. ग्रामीण महाराष्ट्रातही आपल्याला नवा पर्याय उभा राहू पाहात आहे हे दिसू लागल्यावर पवारांनी त्यांचा तोपर्यंतचा सुसंस्कृत, उदारमतवादी चेहरा बाजूला ठेवला आणि ते थेट जातीच्या आश्रयाला गेले हेच या उदाहरणांतून दिसले. 

सध्या काही विचारवंत राजकारणातल्या सभ्यता, उदारमतवाद संपत चालला आहे असे सांगताना पवारांचे दाखले देतात. मात्र पवारांनी राजकारणात वेळप्रसंगी जात-पात आणण्यास मागे-पुढे न पाहून राजकारणातील सभ्यता, उदारमतवाद, सुसंस्कृतता मुळा मुठेत बुडवली याचा अनेकांना सोयीस्कर विसर पडला आहे. असो.    या घटनांची आठवण झाली ती पवारांवर समाज माध्यमांमधून झालेली टीका आणि त्यानंतर झालेला गदारोळ, पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे. पवारांबद्दल समाज माध्यमांत वापरली गेलेली भाषा निषेधार्हच आहे. मात्र पवारांनी राजकीय फायद्या-तोट्यांची गणिते पाहून केलेली जातीवादी विधाने तेवढीच निषेधार्ह होती, हेही लक्षात ठेवायलाच पाहिजे. या गदारोळाची आणखी एक काळी बाजूही पाहिली पाहिजे. भीमा कोरेगावची घटना घडल्यावर लगेच सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यात हिंदुत्ववादी शक्तींना दोषी ठरवणारे पवार याबाबतच्या चौकशी आयोगासमोर मात्र मला काहीही माहिती नव्हते, अशी कबुली देतात हाही एक चेहरा आपण पाहिला.

पवारांवर टीका करणारा मजकूर प्रसारित केला म्हणून केतकी चितळे या अभिनेत्री विरुद्ध आणि पवारांच्या निवासस्थानावर आंदोलन केले म्हणून गुणरत्न सदावर्ते यांच्याविरुद्ध राज्यात एकाच वेळी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. सदावर्ते, चितळे यांनी चूक केली आहे, गुन्हाही केला असेल पण त्यांच्याविरुद्ध अशा पद्धतीने अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे सत्र चालू करणे हा खुनशीपणा झाला, ही सूडबुद्धी झाली. अनिल देशमुखांचे १०० कोटी खंडणी प्रकरण, दाऊदच्या जमीन प्रकरणावरून अटक असलेले नबाब मलिक यांचे समर्थन करणारे पवार या प्रकरणात शांत राहिले. खुनशीपणाने सुरू असलेली कारवाई पवारांनी थांबवली असती तर आदर शतपटीने वाढला असता. सध्याच्या दूषित वातावरणात पवारांमुळे नवा पायंडा पडला असता. पण तसे झाले नाही. पवार शांतच राहिले. कधी काळी सह्याद्रीने सुसंस्कृत पवार पाहिले असे म्हणणारे, आता हेही पवार पाहावे लागत आहेत यावर मात्र गप्प आहेत. पवार विरुद्ध पवार हे नाटक या निमित्ताने महाराष्ट्रासमोर सादर झाले आणि त्याच्या सादरीकरणात स्वतःला निस्पृह निरपेक्ष पत्रकार किंवा विचारवंत म्हणवून मिरविणाऱ्या अनेक विचारवंतांचे बुरखे फाटले.

(लेखक प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते आहेत)

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारKetaki Chitaleकेतकी चितळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस