ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेसेना आणि भाजपा यांच्यात जोरदार कलगीतुरा सुरू आहे. त्यातचं आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना आणि भाजपामधील कटुतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचे म्हटले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार बोलत होते.
मध्यावती निवडणुकीबाबत मी गेल्या दीडवर्षांपूर्वी बोललो होतो, त्यामुळे हे आत्ताचे विधान आहे असे काही नाही. शिवसेना आणि भाजपा यांच्यातील संबंध तुटण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसेच, दिल्लीतील भाजपाच्या नेत्यांच्या मनात सुद्धा शिवसेनेबाबत कटुता असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील शेतक-यांची कर्जमाफी ही सत्तेत राहण्यासाठी शिवसेनेची एक खेळी आहे. राज्य सरकारने शेतक-यांची कर्जमाफी केली तर राज्य सरकारला पाच वर्ष पाठिंबा देऊ, असे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरुन दिसून आल्याचे शरद पवार यांनी सांगत शिवसेनेवर निशाना साधला.
याचबरोबर मुंबईतल्या समस्यांना शिवसेनेसोबतच भाजपाही तितकाच जबाबदार आहे. तसेच, नव्या योजनांबाबत राज्य सरकार उदासीन आहे, असे यावेळी शरद पवार म्हणाले.