Sharad Pawar on Rajya Sabha MP: महाराष्ट्राच्या राजकारणात आज आणखी एक निवडणूक बिनविरोध पार पडली. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सात खासदार जाणार आहेत. या जागांसाठी अनेकजण उत्सुक होते. यातील एक जागा महाविकास आघाडीला मिळाली तर इतर सहा जागी महायुतीने उमेदवार दिले होते. भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते, माया इवनाते; शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून पार्थ पवार यांना राज्यसभा खासदारकीची उमेदवारी मिळाली. तर महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली. सात जागांसाठी सात अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार स्वत: अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहू शकले नाही. पण त्यांनी सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
शरद पवार काय म्हणाले?
आपल्या एक्स पोस्टमध्ये शरद पवारांनी लिहिले, "१९६७ पासून माझा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू झाला आणि आजपर्यंत तो अखंडपणे सुरू आहे. हा प्रदीर्घ प्रवास केवळ माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, कारण त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा संसदीय प्रवास कधीही खंड न पडता पुढे सुरू ठेवणे मला शक्य झाले. १९६७ मध्ये प्रथम महाराष्ट्रात विधानसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाली. सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात सातत्याने काम करत असताना लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली. तसेच केंद्रात संरक्षणमंत्री आणि दहा वर्षे कृषीमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारीही मला मिळाली. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना महाराष्ट्रासाठी तसेच देशासाठी सकारात्मक काम करता आले, यामागे जनतेचा विश्वास हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ राहिले आहे."
"महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. या विश्वासाबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचा तसेच माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी आहे. महाराष्ट्राने मला दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच माझ्या आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी आयुष्यभर मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देत ही सेवा प्रामाणिकपणे करत राहण्याचा माझा प्रयत्न असेल. सध्या डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे शक्य नसल्याने या पत्रकाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत माझ्या भावना पोहोचवत आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रेम, पाठिंबा आणि विश्वास हेच माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहतील. धन्यवाद" असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Web Summary : Sharad Pawar elected unopposed to Rajya Sabha, expresses gratitude to Maharashtra's people for their unwavering support throughout his long political journey. He acknowledges their trust as his greatest strength.
Web Summary : शरद पवार राज्यसभा के लिए निर्विरोध चुने गए, महाराष्ट्र के लोगों को उनकी अटूट समर्थन के लिए आभार व्यक्त किया। उन्होंने उनके विश्वास को अपनी सबसे बड़ी ताकत माना।