कोल्हापूर : ज्या पद्धतीने लोकसभा व विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो तसे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळीकडेच एकत्र लढणे शक्य नाही, प्रत्येकाची बलस्थाने पाहून त्या त्या वेळी निर्णय घ्यावे लागतील, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत मांडली.शरद पवार म्हणाले, सर्वच पक्षांची विविध ठिकाणी बलस्थाने आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळीकडेच एकत्र येणे अशक्य आहे. याचे निर्णय त्या त्या वेळी घेतले जातील. मुंबईत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत असतील तर ते चांगलेच आहे. मुंबई, ठाणे येथे शिवसेना शक्तीशाली आहे. त्यामुळे याचा फायदा त्या दोघांनाही अन महाविकास आघाडी म्हणून आम्हालाही होईल.
सामाजिक ऐक्यासाठी पुढाकार घ्याराज्यात जातीय तेढ वाढल्याची खंत व्यक्त करत पवार म्हणाले, राज्य सरकारने राज्यात सामाजिक ऐक्य प्रस्तापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती. सरकारने हाके किंवा अन्य कोणाच्या बोलण्याकडे लक्ष न देता सर्वांमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत; पण दुर्दैवाने तसे होत नाही.
त्यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्नच उपस्थित झाला नाहीमराठा समाजाचा ओबीसींच्या यादीत आपण समावेश केला नसल्याची टीका होते या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, १९९४ मध्ये मंडल आयोगाच्या वेळी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा हा प्रश्न त्याकाळी उपस्थितच झाला नाही. त्यावेळी छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बसून निर्णय घेतले. मात्र, आता असे एकत्रित बसून निर्णय होत नसल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.विश्वासार्हता जपण्याचे काम निवडणूक आयाेगाने करावेनिवडणूक आयोगाने विश्वासार्हता गमावली आहे. एकाचवेळी संसद सोडून ३०० खासदार निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरण्याची ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आयोगाने विश्वासार्हता जपण्याची खबरदारी घ्यावी, असा सल्ला पवार यांनी दिला.
देवाभाऊंनी आशीर्वाद मागू नये, कार्यही करावेछत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढे आशीर्वाद मागतानाच्या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचा संदर्भ देत पवार म्हणाले, शिवाजी महाराजांनी दुष्काळात सोन्याचा फाळ तयार करुन शेतकऱ्यांची जमीन नांगरली होती. आता अतिवृष्टीमुळे राज्यात शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनसह इतर पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे छत्रपतींचा आशीर्वाद मागणाऱ्या देवाभाऊंनी छत्रपतींच्या कार्याचा आदर्श घेऊन शेतकऱ्यांना मदतरुपी धीर द्यावा.
७५ वर्षांनंतर मी थांबलो नाही, मोदींना थांबायला कसे सांगू ?
मी वयाच्या ७५ वर्षांनंतर थांबलो नाही, तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थांबायला सांगण्याचा नैतिक अधिकार नाही.. या शब्दांत शरद पवार यांनी भाजपने राजकीय निवृत्तीबाबत ठरवलेल्या डेडलाईनवर भाष्य केले. पवार म्हणाले, माझ्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. नरेंद्र मोदींनी राजकारण आणले नाही, आम्हीही आणत नाही. त्यांना ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आहेत. देशासाठी त्यांना जे काही करायचे आहे, ते त्यांनी योग्य करावे, अशी सदिच्छाही पवार यांनी व्यक्त केली.