Sharad Pawar On PM Modi Retirement: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. डोळ्यांसमोर मोठे ध्येय ठेवण्याची व ते साध्य करण्याची संस्कृती देशात तुमच्यामुळे रुजली आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदी यांना शुभेच्छा देताना म्हटले आहे. तसेच उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, विविध पक्षांचे नेते आणि जगभरातील अनेक प्रमुख नेत्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. तसेच मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मूळगावी, गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगरमध्ये, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यातच ७५ वर्षांचे झाल्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या निवृत्तीबाबत विरोधकांकडून सातत्याने विचारणा केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. २०२४ पासून पंतप्रधान मोदी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यानंतर निवृत्त होतील, अशी चर्चा सुरू होत्या. इतकेच नाही तर भाजपामध्ये ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्या नेत्यांना बाजूला सारून नव्या नेतृत्वाला संधी, असा भाजपात नियम असल्याचे मानले जाते. यानंतर नरेंद्र मोदी हे राजकारणातून निवृत्ती घेणार का, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबाबत शरद पवार यांनी मोठे विधान केले.
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले...
नरेंद्र मोदींचा ७५ वा वाढदिवस झाला. हा दिवस कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ व्या वर्षात पदार्पण केले. मी त्यांना पत्र लिहिले आणि अभिनंदन केले. आम्ही सगळे जण यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारात वाढलेले लोक आहोत. अशा प्रसंगांमध्ये आम्ही कुठलेही राजकारण आणत नाही. अनेकांनी, देशातील आणि देशाबाहेरील नेतृत्वांनी मोदींना शुभेच्छा दिल्या त्या योग्यच आहेत. माझा ७५ वा वाढदिवस होता त्यावेळी मोदी स्वतः आले होते. त्यावेळी त्यांनीही राजकारण आणलं नाही आम्हीही आणू इच्छित नाही. मी ७५ व्या वर्षानंतर मी थांबलो नाही त्यामुळे पंतप्रधानांनी थांबावे, हे सांगायचा मला नैतिक अधिकार नाही. मी ८५ वर्षांचा आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नरेंद्र मोदी, तुमच्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो. तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आपल्या देशाची प्रगती सतत होत राहो आणि येणाऱ्या काळात देशाचे अधिकाधिक कल्याण आणि विकास होत राहो अशी मी आशा करतो, अशा शब्दांत शरद पवार यांनी मोदींना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा दिल्या.