पुणे/कोल्हापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरमध्ये आणि कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) येथे झालेल्या दोन भीषण अपघातांमध्ये एकूण सात जण जागीच ठार झाले आहेत. सोमवारी सकाळी आणि रविवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातांत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) येथील बस स्थानकाजवळ रविवारी मध्यरात्री दूध टँकर व झायलो गाडीची टक्कर झाली. यात झायलो कारमधील चौघे जण जागीच ठार झाले, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर टॅँकर चालक पसार झाला आहे. शिवराज बाजीराव पाटील (३०), कपिल विजय पाटील (२८), प्रवीण प्रकाश मोहिते (३५, सर्व रा. कर्नाळ, ता. मिरज जि.सांगली) तर अनंतकुमार शांतीनाथ खोत (३५, रा. नांद्रे) अशी मृतांची नावे आहेत. तर संतोष गणू दैत्य (३०, रा. भांडूप मुंबई) व सचिन सोमा जामखंडेकर (३०, रा. तांबेनगर मुलुंड, मुंबई) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बायपास सर्कलजवळ भरधाव वेगातील इनोव्हाने दुचाकीला ठोकर मारून, सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वारासह इनोव्हातील दोघे जागीच ठार झाले. तर एक महिला गंभीर जखमी झाली. रत्नाकर कृष्णराव जीतकर (६५, रा., पुणे), श्यामकांत मधुसूदन शुक्ल (६०, पुणे), दशरथ त्रिंबक फडतरे (५०,सोलापूर) अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत. सुरेखा दादासाहेब शिंदे (५०, सोलापूर) असे दुचाकीवरील जखमी महिलेचे नाव आहे. अपघातानंतर पसार झालेल्या इनोव्हा चालकावर इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दोन भीषण अपघातांत सात जण ठार
By admin | Updated: September 15, 2015 01:22 IST