मुंबई : राज्यभरात स्वाइनमुळे एका दिवसांत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर स्वाइन फ्लूच्या २५४ रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले. नागपूर, अमरावती, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, गोंदिया आणि पुणे ग्रामीण येथील प्रत्येकी एकाचा स्वाइन फ्लूमुळे २९ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. एका दिवसात स्वाइन फ्लूचे नवीन २८ रुग्ण राज्यात आढळले आहेत. १ जानेवारी ते २९ सप्टेंबर या कालावधीत राज्यात एकूण ७५२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर राज्याबाहेरून आलेल्या ३८ जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या २५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ६ हजार ८८२ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. स्वाइन फ्लूमुळे २१ जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे थुंकी, शिंकण्यावाटे बाहेर पडणाऱ्या थेंबातून त्याचा प्रसार होतो. अनेकदा रुग्ण दुर्लक्ष करतात. यामुळे आजार बळवण्याची शक्यता असते. स्वाइन फ्लूला आळा घालण्यासाठी डॉक्टरांची कार्यशाळा घेण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याकडून मिळाली. (प्रतिनिधी)
राज्यात स्वाइनमुळे सात जणांचा मृत्यू
By admin | Updated: September 30, 2015 02:15 IST