प्रासंगिक- जयेश शिरसाट
गेल्या रविवारी मुंबईच्या वांद्रे-कुर्ला या व्यापारी संकुलात (बीकेसी) बेस्ट बसखाली दोन तरुणी चिरडल्या. क्षणार्धात बसभोवती बघ्यांची गर्दी जमली. तिथलं चित्र काळजाचा ठाव घेणारं होतं. त्या तरुणींचे रक्ताळलेले, गंभीर जखमी झालेले देह त्यात पडले होते. हे दृश्य पाहून गर्दी चुकचुकत होती. डोळे घट्ट मिटून घेत होती. पण त्यातल्या एकानेही या दोन तरुणींना त्या अवस्थेत गाडीत घालून जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची हिंमत दाखवली नाही. गर्दीतली एक महिला सर्वांना आवाहन करत होती, बघताय काय, उचला, यांना हॉस्पिटलला नेऊ, कदाचित वाचतील... पण नाही. मदत सोडाच, उलट त्या आवाहनानंतर गर्दी पांगू लागली. इतका वेळ दाटीवाटीने उभे राहिलेले अचानक घाई असल्याचे भासवून गर्दीतून वाट काढण्यासाठी धडपडू लागले. बरं मदत नको, किमान पोलिसांना तरी बोलवा. तेही नाही. प्रत्येकाच्या हाती मोबाइल होता. मोबाइलचा वापर पोलिसांना बोलावण्याऐवजी अपघाताचे फोटो काढण्यासाठी झाला. ते काढून व्हॉट्स अॅपवर धाडण्याची किळसवाणी वृत्ती दिसली. पुढे १०-१५ मिनिटांनंतर पोलीस आले. मात्र, गर्दी पांगवून तरुणींना रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.दोन दिवसांपूर्वी भरगच्च लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला पोलीस शिपाई हर्षा जाधव (२३) यांनाही मुंबईकरांच्या या बदलत्या मानसिकतेचा अनुभव आला. मानखुर्द-कुर्ला प्रवासादरम्यान गोवंडी स्थानकाआधी कोणीतरी फेकलेली लोखंडी सळई जाधव यांना लागली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. गोवंडी स्थानकात कशाबशा उतरल्या. वेदना असह्य होत्या. जखमेतून रक्त भळाभळा वाहत होतं. गोवंडीला उतरल्यानंतर कोणीतरी आधार देईल, हॉस्पिटलला नेईल, असं त्यांना वाटत होतं. जाधव गणवेशात होत्या. ‘काय झालं, कसं झालं,’ ही विचारपूस सोडा... ‘हे पाणी प्या... जरा बरं वाटेल,’ ही आस्थाही सोडा... कुणी त्यांच्याकडे पाहातही नव्हतं. जो-तो लोकल पकडण्याच्या गडबडीत. कालांतरानं जखमी जाधव यांच्याकडे काही प्रवाशांचं लक्ष गेलं. पण या गर्दीनं त्यांचं मोबाइलमधून व्हिडीओ शूटींग सुरू केलं. फोटो काढले. बऱ्याच वेळाने रेल्वे पोलीस आले आणि त्यांनी जाधव यांना रुग्णालयात दाखल केलं. या अनुभवानंतर जाधव यांनी मुंबईकरांमधली माणुसकीच संपल्याची प्रतिकिया दिली. मुंबईत घडलेले बॉम्बस्फोट, २६/११चं युद्ध, २६ जुलैचा पूर या आणि अशा अनेक घटनांमध्ये घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या, पोटापाण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या मुंबईकरांमधली माणुसकी ठळकपणे दिसली होती. प्रत्येक बॉम्बस्फोटात जखमींना रुग्णालयात पोहोचवलं ते सर्वसामान्य मुंबईकरानं. धर्म, जात, गरीब-श्रीमंत हा भेद विसरून केवळ माणुसकीपोटी बेभान होऊन रक्ता-मांसाच्या चिखलात तडफडणारे देह काढून, अंगाखांद्यावर लादून रुग्णालयाच्या दिशेने धावणारा मुंबईकर सर्वांनीच पाहिला होता. २६ जुलैच्या पुरात ओळख ना पाळख पण बुडणाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढणाराही सर्वसामान्य मुंबईकरच होता. या प्रवासात जागोजागी पाणी, चहा, बिस्कीटं वाटणाराही सर्वसामान्य मुंबईकरच होता. अशा संवेदनशील मुंबईकरांचं अचानक असं कसं झालं. त्यांच्यातली संवेदना नष्ट झालीय की काय, हा प्रश्न या दोन घटनांमुळे पडणं स्वाभाविक आहे. होय, मुंबईकरांची संवेदना मेलेय. गुन्हे शाखेत अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनुसार मुंबईकरांची संवेदना मेलेय. दे सेलीब्रेट एनीथिंग. कोणतीही घटना ते साजरी करतात, त्याचा उत्सव करतात. चर्चगेटला लोकल ट्रेनचा अपघात झाला. अपघातग्रस्त लोकलसोबत मुंबईकरांनी सेल्फी काढले. हा कहर आहे. अपघात रविवारी झाला. तोच सोमवारी झाला असता तर? या लोकलमध्ये किंवा चर्चगेट स्थानकावर मी असतो तर? या विचाराऐवजी मुंबईकरांनी हा अपघात सण म्हणून साजरा केला. मुंबईकरांच्या याच मानसिकतेमुळे स्ट्रीट क्राइम वाढलंय. चेनस्नॅचिंग झाल्यावर किंवा एखाद्या तरुणीला छेडलं जात असेल तर पाठलाग, आरडाओरडा करण्याऐवजी लोक बघत बसतात, असं हे अधिकारी सांगतात. व्हॉट्स अॅपवर एकेका ग्रुपमध्ये शंभर ते दीडशे पोस्ट्स येतात. त्यातल्या ९० टक्के न वाचताच डीलीट करतो, असं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रवी अभ्यंकर सांगतात. मुंबईकरांच्या मानसिकतेबाबत ते म्हणाले, गर्दीत स्वत:चं, वेगळं अस्तित्व नसतं. प्रत्येक जण गर्दीसोबत हरवून जातो. मदतीचा हात पुढे केला काय किंवा दुर्लक्ष केलं काय कोणीही विचारत नाही, जाबजबाब, खटल्यात साक्ष, या कारवाईमुळे लोकांना भीती वाटते. बीकेसी काय किंवा गोवंडी काय अशा घटनांमध्ये जनतेने सहकार्य करायलाच हवं, गोल्डन अवरची जाणीव ठेवून जखमींना वैद्यकीय मदत वेळेत मिळेल यासाठी धडपड हवी, असं मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी सांगतात.