मुंबई : पाकिस्तानचे माजी विदेशमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर सकाळी झालेली शाईफेक आणि कार्यक्रम उधळून लावण्याच्या शिवसेनेच्या वल्गनेचा केलेला पोलीस बंदोबस्त, या पार्श्वभूमीवर यशस्वी झालेल्या कार्यक्रमामुळे बालेकिल्ल्यातच शिवसेनेची पुरती नाचक्की झाली. शिवाय, आजच्या घटनांमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेकडेच अंगुलीनिर्देश केला. कसुरी यांच्या ‘नायदर अ हॉक नॉर अ डोव्ह’ या भारत-पाकिस्तान संबंधावरील ग्रंथाचे अलीकडेच दिल्लीत प्रकाशन झाले. त्याच ग्रंथाचे मुंबईत प्रकाशन करण्याकरिता कसुरी येणार हे जाहीर होताच शिवसेनेने हा कार्यक्रम रद्द करा, अन्यथा उधळून लावू, असा इशारा दिला. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे (ओआरएफ) सुधींद्र कुलकर्णी आणि नेहरू सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश साहनी यांनी रविवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कार्यक्रमाला विरोध न करण्याची विनंती केली. मात्र ठाकरे यांनी आपला हेका सोडला नाही. त्यावर हा कार्यक्रम रद्द करणे हा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीचा अपमान करण्यासारखे होईल, असे त्यांना सुनावत साहनी व कुलकर्णी ‘मातोश्री’बाहेर पडले.सोमवारी सकाळी सुधींद्र कुलकर्णी हे घराबाहेर पडले तेव्हा सात-आठ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर काळी शाई ओतून कसुरींचा कार्यक्रम आयोजित केल्याचा निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र सुरुवातीपासून कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रम व्हावा यावर ठाम होते. त्यांनी या कार्यक्रमाला संपूर्ण संरक्षण देण्याची भूमिका घेतली होती. अगदी अलीकडे गझन गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमालाही शिवसेनेने विरोध केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेची हमी दिली होती. मात्र आयोजकांनीच कार्यक्रम रद्द केला. मुख्यमंत्री ठाम आहेत आणि शाई फेकूनही कुलकर्णी यांचा निर्धार तसूभरही ढळलेला नाही हे पाहिल्यावर दुपारपासून शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली. अगोदर शिवसेनेने आंदोलन मागे घेतल्याचे संदेश व्हॉटसअॅपवर फिरले की फिरवले गेले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक पत्र लिहिले व त्यामध्ये कसुरी विदेशमंत्री असताना त्यांनी केलेली भारत विरोधी वक्तव्ये व घेतलेल्या भारत विरोधी भूमिकांची माहिती देत हा कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश आयोजकांना द्यावे, असे सांगत आपल्या खांद्यावरील जबाबदारी झटकली. त्यामुळे थेट आंदोलन मागे न घेता कार्यक्रम उधळण्याची आपली घोषणाच शिवसेनेने वाऱ्यावर सोडून दिली. त्यामुळे शिवसैनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरकलेही नाहीत.(विशेष प्रतिनिधी)>>>>>>>तेव्हा कुठे होता राष्ट्रवाद?पाकिस्तानी पंतप्रधानांच्या उपस्थितीत शिवसेना खासदार अनंत गीते यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा कुठे हरवला होता शिवसेनेचा राष्ट्रवाद, असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. भाजपाचे सरकार शिवसेनेला काडीचीही किंमत देत नाही, हे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे हिंमत असेल तर शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडून आपला स्वाभिमान दाखवून द्यावा, असे आव्हान विखे यांनी दिले.>>>>>>>> वैचारिक मतभिन्नतेला हिंसेच्या माध्यमातून उत्तर देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. ही प्रवृत्ती लोकशाहीला मारक असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले.>>>>>> महाराष्ट्र बदनाम झालाआपण एखाद्या व्यक्तीच्या मताशी सहमत नसलो तरी जेव्हा एखादा विदेशी पाहुणा किंवा राजनैतिक अधिकारी एखाद्या कार्यक्रमाकरिता येतो व तो कार्यक्रम कायद्याचे उल्लंघन करणारा नसतो तेव्हा राज्य सरकारने अशा कार्यक्रमाला संरक्षण देणे ही त्या सरकारची जबाबदारी असते. कसुरी यांच्या मताचे आपण समर्थन करीत नसलो तरी आपल्या राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे हे दाखवून देणे सरकारची जबाबदारी आहे. परंतु या संदर्भात ज्या घटना आज घडल्या त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली. यापेक्षा वेगळ््या पद्धतीने आपला विरोध दर्शविणे शक्य झाले असते. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र>>>>>>>>>>> शाईफेक : सहा जणांना अटकपाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजक आणि आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर सोमवारी सकाळी त्यांच्या सायन येथील निवासस्थानाबाहेर अज्ञात व्यक्तींनी शाईफेक केली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढला.या प्रकरणी अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात सात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अँटॉपहिल पोलिसांनी गजानन पाटील, प्रसाद अगने, अशोक वाघमारे या शाखाप्रमुखांसह व्यंकटेश नायर, समाधान जाधव आणि सर्जेराव जाधव या सहा जणांना अटक केली आहे. या अटकेनंतर पोलीस स्टेशनबाहेर मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, शिवसेना पदाधिकारी मंगेश सातमकर यांच्यासह कार्यकत्यांनी गर्दी केली होती.असे घडले शाईनाट्यप्रकाशन सोहळ्याचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी सोमवारी सकाळी त्यांच्या महेश्वरी उद्यान येथील निवासस्थानाबाहेर पडले. त्याचवेळी काही तरुणांनी त्यांच्यावर शाई ओतली. कपड्यांवर पडलेली काळी शाई आणि माखलेल्या चेहऱ्यानेच कुलकर्णी यांनी तातडीने खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्यासह पत्रकार परिषद घेतली.
सेनेची नाचक्की!
By admin | Updated: October 13, 2015 04:26 IST