परदेशी यांचा ‘सिक्रेट’ दौरा
By admin | Published: September 19, 2014 12:59 AM2014-09-19T00:59:09+5:302014-09-19T00:59:09+5:30
बिबट्यांच्या शिकारी प्रकरणाने वन विभाग चांगलाच हादरला आहे. भिवापूर येथे गत आठ दिवसांत दोन बिबट्यांचे चामडे वन विभागाच्या हाती लागले आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही मोकाट
बिबट्याचे शिकार प्रकरण : वन विभाग हादरला
नागपूर : बिबट्यांच्या शिकारी प्रकरणाने वन विभाग चांगलाच हादरला आहे. भिवापूर येथे गत आठ दिवसांत दोन बिबट्यांचे चामडे वन विभागाच्या हाती लागले आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे. यामुळे अख्खा वन विभाग अस्वस्थ झाला असून, गुरुवारी स्वत: वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी सकाळी १० वाजताच्या सुमारास उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा ‘सिक्रेट’ दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पोकीम व मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी होते. प्रधान सचिवांनी सर्वप्रथम नवेगाव येथील रेस्टहाऊसवर भेट देऊन, त्यानंतर पवनी वन परिक्षेत्रात दौरा केल्याची माहिती आहे.
वन विभागाच्या विशेष पथकाने गत १२ सप्टेंबर रोजी भिवापूर येथे रणजितसिंग जुनी या आरोपीला बिबट्याच्या चामड्यासह रंगेहात अटक केली. मात्र त्याच वेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रावण वाघमारे हा घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला होता. यानंतर चार दिवसात पुन्हा येथील एका शेतातील झुडपात दुसऱ्या एका बिबट्याचे चामडे सापडले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणातील दोन्ही आरोपी सराईत शिकारी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्यांनी या दोन बिबट्यांसह पुन्हा काही वाघ व बिबट्यांचा बळी घेतला का? अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. यातील मुख्य आरोपी श्रावणच्या घरापासून काहीच अंतरावर उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य असून, येथे वाघ व बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. (प्रतिनिधी)
मुख्य आरोपी मोकाटच
माहिती सूत्रानुसार बिबट्याच्या शिकार प्रकरणातील मुख्य आरोपी श्रावण वाघमारे हा खुलेआम मोकाट फिरत आहे. तो रोज घरी जेवण करायला येत असून, यानंतर पुन्हा फरार होत असल्याची माहिती आहे. त्यानुसार बुधवारीसुद्धा तो घरी आला होता. तसेच गुरुवारी सायंकाळीसुद्धा तो जेवण करून गेला. विशेष म्हणजे, त्याच्या या हालचालींची वन विभागाला वेळोवेळी माहिती मिळत असून, त्याची स्वत: एका वनाधिकाऱ्यांनी चौकशी अधिकारी आरएफओ बेलेकर यांना माहिती दिल्याचे सांगितले जाते. परंतु असे असताना आरोपी श्रावण याला अटक का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.