पिंपरी : कोणत्याही विभागातील बेशिस्तपणा, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील कामातील दुर्लक्षाबाबतची कबुली दिली. तसेच सहायक आयुक्त मिनीनाथ दंडवते यांना बदलण्याचे संकेत दिले. थेरगाव येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यात ‘नव्याचे नऊ दिवस संपले, आता कारवाई करा,’ असे अजित पवार यांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांना जाहीर व्यासपीठावरून सुनावले होते. त्यानंतर शहरातील कचरा समस्येबाबत नगरसेवकांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत नगरसेवकांनी आरोग्य विभागाचे वाभाडे काढले होते. आरोग्य प्रश्न गंभीर होत असल्याने सहायक आयुक्त मिनीनाथ दंडवते यांना राज्य सरकारकडे परत पाठविण्याची मागणी केली. तसेच शहरातील सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच ठेकेदारांवर नियंत्रण नसल्याने शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी केली होती. महापालिका क्षेत्रात स्वच्छ या संस्थेच्या वतीने योग्य प्रकारे काम केले जात नाही. घरापुढील रस्त्यावर कचरागाडी न आणता या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी उद्धटपणे वर्तन केले जात असल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. पवारांनी आयुक्तांचे कान टोचल्यानंतर कडक धोरण आयुक्तांनी स्वीकारले आहे. आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘‘आरोग्य समस्यांबाबत सदस्यांनी तक्रारी केल्या. याची शहानिशा केली आहे. काही कर्मचारी काम करीत नसतील, कामगार संघटना कर्मचाऱ्यांवरील कारवाईला विरोध करत असेल, तर हा विरोध मोडून काढत कामचुकारांवर निलंबनाची कारवाई करा.’’ (प्रतिनिधी)>एकाच संस्थेला काम, काम न करणाऱ्या संस्था काळ्या यादीत कचऱ्याबाबतही व्हॉट्स अॅप क्रमांक सुरू केला होता. त्यास प्रतिसाद न मिळाल्याचे आयुक्तांनी सांगितले. कचरा उचलणाऱ्या संस्थेस काळ्या यादीत टाका, अशी मागणी सदस्यांनी केली होती. त्यावर आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘‘कचरा गोळा करण्याचे काम वेगवेगळ्या संस्थांना दिले आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणणे प्रशासनास जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे कचरा गोळा करणे आणि तो कचरा डेपोपर्यंत पोहोचविणे ही कामे वेगवेगळ्या संस्था करतात. त्यामुळे एकाच संस्थेस हे काम द्यायला हवे. ‘स्वच्छ’विषयी तक्रारी आल्या आहेत. काम योग्य प्रकारे न करणाऱ्या संस्थेला काळ्या यादीत टाकावे, अशा सूचना दिल्या आहेत.’
शिस्तीची फोडली डरकाळी
By admin | Updated: August 4, 2016 01:11 IST