मोदींचा नागपुरात सवाल : सत्ता आल्यास विकासनागपूर : राज्यात १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला सत्तेतून दूर करा, तुम्हाला ‘स्कील्ड’ महाराष्ट्र हवा की ‘स्कॅम’ महाराष्ट्र हवा, हे तुम्ही ठरवा, काँग्रेसने घोटाळे दिले, भाजपचे सरकार आले तर कुशल महाराष्ट्र (स्कील्ड महाराष्ट्र)घडवू , असा विकासाचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात दिला. नागपूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी यांची येथील कस्तूरचंद पार्कवर जाहीर सभा झाली. त्यावेळी मोदी बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खासदार अजय संचेती उपस्थित होते.भाषणाची सुरुवात मराठीतून करीत मोदी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रचार काळातील सभांना मिळणाऱ्या लोकांच्या प्रतिसादाचा उल्लेख केला. लोकसभेच्या तुलनेत आता लोकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेतला तर हवेची दिशा कोणत्या बाजूने आहे, हे कळून चुकेल. राजकीय पंडितांनी याचा अंदाज घ्यावा, अन्यथा लोकसभेप्रमाणे त्यांचे अंदाज चुकतील आणि लोकसभेप्रमाणेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला संपूर्ण बहुमत मिळेल, असे मोदी म्हणाले.मोदी यांनी राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. १५ वर्षांपासून आघाडी सरकारकडून लूट सुरू आहे. सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही. त्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. या काळात दोन पिढ्या बरबाद झाल्या. महाराष्ट्र समृद्ध असेल तर देश समृद्ध होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीने आतापर्यंत घोटाळ्याचे (स्कॅम) सरकार दिले, भाजपला सत्ता दिली तर आम्ही ‘स्कील्ड’ सरकार देऊ. १५ वर्षांच्या पापी सरकारला १५ तारखेला मतदान करून दूर करा, असे आवाहन मोदी यांनी केले.केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर स्कील्ड डेव्हलपमेंटसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू केले. नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात यासंदर्भात एक सामंजस्य करारही करण्यात आला. त्यानुसार भारताने हजार तज्ज्ञांची मागणी अमेरिकेला केली आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल व त्यातून एका कुशल महाराष्ट्राची जडणघडण होईल. केंद्राची विकासाच्या क्षेत्रात गतीने वाटचाल सुरू आहे. हे करताना आम्हाला महाराष्ट्राला सोबत घ्यायचे आहे. दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्राचे चित्र पालटून देऊ, असे मोदी म्हणाले.मुख्यमंत्र्यांवर टीकाजो मुख्यमंत्री माझ्या बाजूला बसायला घाबरतो तो सोबत काम कसे करेल, असा टोला मोदी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. नागपुरातील मेट्रो रेल्वेच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री का आले नाही? केंद्र आणि राज्याने ‘टीम इंडिया’ म्हणून काम करावे. पक्ष वेगवेगळे असू शकतात, पण देश एक आहे. एकसंघपणे काम करण्याची संस्कृती रुजविण्याचे आमचे प्रयत्न आहे. भाजपने कधीही राजकीय भेदभाव केला नाही. देशाचे पंतप्रधान दिवंगत पंडित नेहरू यांच्या जयंतीपासून म्हणजे १४ नोव्हेंबरपासून तर माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनापर्यंत म्हणजे १९ नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण भारतात शाळाशाळांमध्ये मुलांना स्वच्छतेची शिकवण देणारी मोहीम राबविली जाईल व २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला घर मिळेल अशी योजना राबविली जाईल, असे मोदी म्हणाले.देशात ६० वर्षे काँग्रेसचे सरकार होते. पण ते कधीही त्यांच्या कामाचा हिशेब देत नाही. पण आम्हाला ते ६० दिवसांच्या कामाचा हिशेब मागतात. ६० दिवसांत केंद्र सरकारने अनेक कामे केली. कैलास मानसरोवर यात्रेसाठी रस्ता सुरू करण्यास चीनने मान्यता दिली; त्यामुळे वृद्धांनासुद्धा आता मोटारीने तेथे जाता येईल. पूर्वी हे शक्य नव्हते. भारताचे अमेरिकेत नाव झाले. लोकांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. महाराष्ट्राची सत्ता भाजपला मिळाली तर देशातही या राज्याचा लौकिक वाढविला जाईल, असे मोदी म्हणाले.मोदी यांनी जाहीर सभेत चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अहिर यांनी कोळसा घोटाळा संसदेत उघड केला तर फडणवीस यांनी राज्याच्या विधानसभेत अनेक घोटाळे उघड केले. फडणवीस यांना त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कामगिरीबद्दल पुरस्कारही मिळाला. अशा तरुण नेत्याला निवडून देणाऱ्या मतदारांचा मी आभारी आहे, असे मोदी म्हणाले.सुरुवातीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, देवेंद्र फडणवीस, सुलेखा कुंभारे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर महापौर प्रवीण दटके, आमदार व भाजपचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांच्यासह पक्षाचे उमेदवार अनुक्रमे विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, चंद्रशेखर बावनकुळे, समीर मेघे, सुधीर पारवे, आशिष देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी, डॉ. मिलिंद माने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गिरीश व्यास यांनी तर आभार आमदार अनिल सोले यांनी मानले. (प्रतिनिधी)
स्कील्ड महाराष्ट्र हवा की स्कॅम महाराष्ट्र?
By admin | Updated: October 8, 2014 00:45 IST