अवसरी : माळीण गावावर पडलेला तब्बल २५ फूट मातीचा ढिग हलविण्याचे काम अद्याप सुरू असून शुक्रवारी मुख्य गावापर्यंत राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे (एनडीआरएफ) पथक पोहोचले. धान्याच्या कणग्या, भांडी, फोटो आणि इतर जीवनोपयोगी वस्तूंसह मृतदेह सापडण्याचे प्रमाणही वाढले आहे. दबलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी शुक्रवारी एनडीआरएफचे श्वानपथकही आणण्यात आले होते. मात्र, चिखल व पावसामुळे नागरिकांचा शोध घेण्यात श्वानांना यश आले नाही.घटनेला तीन दिवस उलटून गेल्याने गावामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे. सात जेसीबी मशिनद्वारे ढिगाऱ्याखाली दबलेल्या नागरिकांचे शोधकार्य सुरू आहे. जेसीबी तसेच यंत्राच्या साह्णाने माती बाजूला केली जात आहे. या ढिगाऱ्याखाली दबलेल्या जीवंत नागरिकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या उदय, बर्ली, बर्कली, बेंगल या चार श्वानांना घटनास्थळी आणण्यात आले. मात्र, चिखल आणि पावसामुळे श्वानांना माग काढता आला नाही.मुख्य गावठाणाच्या ठिकाणी शोधकार्य सुरू झाले असून मातीचा थर चिकट आणि घट्ट झाल्याने जेसीबी यंत्रांना ढिगारा उपसण्यात काहीसा जोर लावावा लागत होता. गावातील काही भाग मोकळा झाल्याने शुक्रवारी पोकलेन मशीनची संख्या वाढवून सात करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी सौरभ राव आणि पोलीस अधीक्षक मनोज लोहिया घटनास्थळी थांबून परिस्थितीवर देखरेख करीत होेते. मदत कार्यातील अडथळा येऊ नये म्हणून पोलीस तैनात होते. मात्र बघ्यांनी बेशिस्तपणे लावलेल्या वाहनांमुळे माळीण फाटा ते अडीवरे या दरम्यानची वाहतुकीची कोंडी आजही कायम होती. (वार्ताहर)
नागरिकांना शोधण्यासाठी श्वानपथकाची मदत
By admin | Updated: August 2, 2014 02:52 IST