- सुभाष कांबळेअथणी - अथणी तालुक्यातील अनंतपूर येथील ५ जणांसह २० भाविकांनी ८ सप्टेंबर रोजी देहत्यागाचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. ‘परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे आम्ही वैकुंठाला प्रयाण करत आहोत,’ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
त्यांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ उडाली असून, या निर्णयापासून त्यांना परावृव करण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरू केले आहेत. चिक्कोडीचे पोलीस उपअधिक्षक सुभाष संपगावी, प्रशांत मुन्नावळी तहसीलदार सिदाराय भोसके, महसूल निरीक्षक विनोद कदम, ग्राम प्रशासक नागेश खानापूर यांनी अनंतपूरला भेट दिली आणि ग्रामस्थांशी चर्चा करून या कुटुंबाचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन ही घटना घडू नये म्हणून प्रयत्न करत आहे.मतपरिवर्तन न झाल्यास या कुटुंबावर कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
या भाविकांमध्ये समावेश असलेल्या माया शिंदे हिचे जत तालुक्यातील कुडनूर हे सासर आहे. पत्नी माया वैकुंठाला जाणार असल्याची बातमी समजताच तिच्या पतीने जत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तुकाराम व माया यांना बोलावून चौकशी केली. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सोडून दिले. तुकाराम यांनी पोलिसांना सांगितले की, परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे आम्ही वैकुंठाला जाणार आहोत. त्यांच्या या जबाबाने जत पोलीस चक्रावून गेले. त्यांनी अथणी पोलिसांना याची माहिती दिली. अथणी पोलिस आता या कुटुंबाचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुणे, विजयपूर, अनंतपूर येथील भक्तांचा समावेशदेहत्याग करणाचा निर्णय घेणाऱ्यामध्ये मूळचे उत्तरप्रदेशचे असलेले पुण्यातील दहा ,अनंतपूर व विजयपूर येथील प्रत्येकी पाच व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्वजण रामपाल महाराजांचे शिष्य असल्याचे संगितले जाते. यापूर्वी ६ ते ८ सप्टेंबरदरम्यान अनंतपूर येथे विशेष महापूजा आयोजित केली आहे. तिचा समारोप देहार्पणाने केला जाणार आहे. हे सारे पाहण्यासाठी भक्तांचा मोठा समुदाय जमणार असल्याचे या भाविकांनी सांगितले.
एकाच कुटुंबातील ५ जण... रामपाल महाराजांची दीक्षाकर्नाटक सीमेवरील अनंतपूर गावात शिंगणापूर रस्त्याला तुकाराम इरकर यांचे ५ सदस्यांचे कुटुंब आहे. इरकर म्हणाले की, रामपाल महाराजांकडून आम्ही दीक्षा घेतली आहे. आता आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असून ८ सप्टेंबर रोजी परमेश्वराचे बोलावणे आले आहे. त्यानुसार ६ सप्टेंबरला सकाळी महापूजेला सुरुवात होईल. ८ रोजी आम्ही देहासह वैकुंठी जाणार आहोत.
महाराजांसाठी चांदीच्या वर्खाची खुर्चीया सोहळ्यात तीर्थ देण्यासाठी येणाऱ्या रामपाल महाराजांना बसण्यासाठी १४ हजार रुपये खर्चून चांदीचा वर्ख असलेली खास खुर्ची आणली आहे. दर तासाला एकदा त्या खुर्चीला साष्टांग दंडवत घालून तीर्थ घेण्याच्या दिवसाची वाट इरकर कुटुंब पहात आहे. या कुटुंबामध्ये तुकाराम यांचा मुलगा रमेश, पत्नी सावित्री, सून वैष्णवी व मुलगी माया शिंदे यांचा समावेश आहे.
सध्याच्या वैज्ञानिक युगामध्ये इरकर कुटुंबाची कृती मानसिक विकृती आहे. ज्या महाराजांच्या आदेशाने त्यांची कृती सुरू आहे, त्याला ताब्यात घेऊन चौकशी व कडक कारवाई आवश्यक आहे.- ॲड. एस. एस. पाटील, अथणीपोलिस खाते व आरोग्य खाते संयुक्तपणे इरकर कुटुंबाची चौकशी करणार आहे. त्यांना वैकुंठास जाण्याला मनाई करणार आहे. या घटनेची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- सिद्धराय भोसके, तहसीलदार, अथणी