मुंबई: राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून सतीश माथुर यांची नियुक्ती करण्यात आली असून, मावळते महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडून ते रविवारी कार्यभार स्वीकारतील. माथुर सध्या लातलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक आहेत. माथुर राज्याचे ४०वे पोलीस महासंचालक असतील. त्यांना ३१ मे २०१८पर्यंतचा म्हणजे २२ महिन्यांचा कार्यकाळ मिळेल. माथुर यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाज्येष्ठतेने केली. होमगार्डचे महासमादेशक राकेश मारिया व केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या मीरा बोरवणकर याही माथुर यांच्याप्रमाणे १९८१च्या तुकडीतील आहेत. गेले दहा महिने महासंचालक राहिलेल्या दीक्षित यांना रविवारी निरोप दिला जाईल. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद मिळणे अभिमानाची बाब असून, ही जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया नूतन पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी ‘लोकमत’शी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र पोलीस दलाला गौरवशाली परंपरा असून, डीजीपी म्हणून अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यामुळे या नियुक्तीने आपल्याला आनंद झाला असून, पदाच्या जबाबदारीचेही भान आहे.’ (प्रतिनिधी)
सतीश माथुर नवे पोलीस महासंचालक
By admin | Updated: July 31, 2016 05:03 IST