Sarpanch Santosh Deshmukh Murder Case ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोप सुरू आहे. दरम्यान, आता मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. 'कृष्णा आंधळेला धनंजय मुंडे यांनी लपवले आहे, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
दोन तास थांबले, नंतर मध्यरात्री मी भेटलो; मुंडे-कराड भेटीविषयी मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड याच्यावर आरोप केले. जरांगे पाटील म्हणाले, यांनी पाप केली आहेत, आता पाप झाकण्यासाठी बाबांचा वापर करत आहेत. सगळ्यांवर अन्याय झाला आहे. लोकांनी व्यक्त झालं पाहिजे, यात ओबीसी असूदेत किंवा मराठा असो किंवा कोणही असो. ही टोळी विचित्र आहे, टोळी संपणार आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
"यांची टोळी मोठी आहे, खंडणी मागणारी, छेडछाडी करणारी टोळी वेगळी आहे. खंडण्या मागून गाड्या घ्यायला चांगलं वाटलं. कृष्णा आंधळे कुठेतर लपला असेल सापडेल. कृष्णा आंधळे कुठेही जाणार नाही. त्याला धनंजय मुंडे यांनीच लपवून ठेवले आहे, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. कृष्णा आंधळेला शोधून काढा नाहीतर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
'मध्यरात्री धनंजय मुंडे मला भेटले'
"विधानसभा निवडणुकीच्या आधी धनंजय मुंडे यांच्याकडून मला ७ ते ८ दिवस भेटीसाठी निरोप येत होता. माझ्याकडे गर्दी असल्याने दोन-तीन वेळा ते अर्ध्या वाटेतून माघारीही गेले होते. त्यानंतर एक दिवस ते रात्री दोन वाजता अंतरवालीला आले. त्यावेळी मी सर्व लोकांना भेटून झोपलो होतो. मात्र एक-दोन तास झाले तरी ते काही तिथून गेले नाहीत. त्यामुळे आमच्या लोकांनी मला झोपेतून उठवलं आणि सांगितलं की तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही, असं धनंजय मुंडेंकडून सांगण्यात आलं आहे. आपण तर सन्मान करणारे लोक आहोत, जातीयवादी लोक नाहीत. त्यामुळे मग मी त्यांना भेटलो. त्यावेळी वाल्मीक कराडही त्यांच्यासोबत होता," अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे.