मुंबई - पावशेर दारू पिऊन जर कुणी भटक्या विमुक्त जातीजमातीचे मंत्री धनंजय मुंडे यांना अपमानित करण्याचं धाडस करत असेल, तो कितीही मोठा असो, त्याची गय केली जाणार नाही. त्याला संविधानिक उत्तर दिलं जाईल. तुमच्या बापाचे रस्ते आहेत का असा सवाल करत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, मनोज जरांगे यांची उंची किती, तुझे शिक्षण किती, काय बोलतो? सुरेश धस असतील, जरांगे पाटील असतील हे मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक आहेत. मृत व्यक्तीच्या नावावर राजकारण करून मंत्रिपद न मिळाल्याने आरोप करतायेत. नगरसेवक होण्याच्या लायकीचे नाहीत. सुरेश धस, मनोज जरांगे पाटील यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. संविधानाने आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. संविधानाची देण म्हणून पंकजा मुंडे, धनंजय मुंडे मंत्री आहेत. सुपारी आणि मंत्रिपदाची लालसा यासाठी मोर्चांमध्ये सहभागी होत आहेत. जिथे दु:ख आहे तिथे तुम्ही शिमग्यासारखं वागतायेत. जातीय तेढ निर्माण करत आहेत. वाल्मिकी कराडला कोर्टाने दोषी ठरवले का, अटक करणे हा कायदेशीर भाग आहे. अटक केली म्हणून कुणी दोषी ठरत नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच सुरेश धस यांनी दुसऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलताना स्वत:चे आयुष्यही लक्षात ठेवले पाहिजे. उंगलीनिर्देश आम्हालाही करता येतात. भटक्या विमुक्तांची इज्जत उघड्यावर टाकली जातेय. पावशेरची दादागिरी चालू देणार नाही. ग्रामपंचायत बंद करण्याचा इशारा दिला, जे बंद करतील ते बडतर्फ होतील. लोकशाहीने दिलेली पदे आहेत. ही पदे कुणाच्या बापाच्या घरची नाहीत. या पदावर राहून माज दाखवता येणार नाही. या पदावर राहून एखाद्या समाजाला दाबता येणार नाही. ग्रामपंचायत बंद करून दाखवली तर हायकोर्टात जाऊ, डंके की चोट हा इशारा देतोय असंही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.
दरम्यान, कुणालाही अटक करण्याचा अधिकार सुरेश धसला आहे का, सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्याची पद्धत इस्लामिक देशात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही निर्माण केलेल्या देशात कायदा परिस्थिती हाताळण्यासाठी संविधान आहे. तुम्ही आग्रह करून कुणाला अटक करू शकत नाही. अटक केलेल्या व्यक्तीला मिनिटामिनिटाचा हिशोब द्यावा लागतो. उगीच कुणाला डांबून ठेवता येत नाही. सरकारने बीड प्रकरणी सीआयडी नेमली आहे त्यात लुडबूड कशाला करतायेत? वाल्मिकी कराडला कोणत्या न्यायालयाने दोषी ठरवलं आहे हे सांगावे असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं.