आळंदी - पाहुनी समाधीचा सोहळा ! दाटला इंद्रायणीचा गळा !! बाळ सिद्ध पाहता चिमुकला ! कुणी गहिवरे कुणी हळहळे ! भाळी लावून चरण रजाला ! चरणावरी लोळला !! चोखा गोरा आणि सावता ! निवृत्ती हा उभा एकटा! सोपानासह उभी मुक्ता आश्रपूर लोटला !!
ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम... असा संजीवन सोहळ्याच्या कीर्तनातील जयघोष... दुपारचे १२ वाजले आणि घंटानाद.. समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी... संत नामदेव महाराज व माउलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे... अशा भावपूर्ण वातावरणात माउलींचा ७२८वा संजीवन समाधी सोहळा ‘माउली - माउलीं’च्या जयघोषात पार पडला. संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘श्रीं’चे दर्शन घेतले.
तत्पूर्वी, माउलींना पवमान अभिषेक व दूधआरती घालून पहाटे तीनच्या सुमारास प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते पूजा केली. वीणा मंडपात देवस्थानच्या वतीने कीर्तन झाल्यानंतर मुख्य संजीवन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. सकाळी संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराजांचे कीर्तन सुरू झाले. यावेळी वीणा मंडपात कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी मोठी रीघ लागली होती.
टाळ-मृदंगाच्या निनादात सोहळा दरम्यान, मंदिराच्या महाद्वारात काल्याचे कीर्तन व हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले. टाळ-मृदंगाच्या निनादात हैबतबाबांच्या दिंडीने समाधी मंदिरास प्रदक्षिणा पूर्ण करून ज्ञानदेवांचा जयघोष केला. दुपारी १२ च्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांमार्फत वीणा मंडपातून कारंज्या मंडप, पंखा मंडप व मुख्य गाभाऱ्यात माउलींच्या समाधीपुढे विराजमान करून ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ...’ अशा जयघोषात माउलींच्या समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी करून समाधी सोहळा साजरा करण्यात आला.
संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त संत नामदेव महाराजांच्या पादुका माऊलींच्या समाधीसमोर ठेवून मंदिरात जयघोष करून समाधी सोहळा झाला. या वेळी समाधीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.