Shiv Sena Thackeray Group MP Sanjay Raut News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होऊ शकतात, असा कयास आहे. यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे सूतोवाच केले आहे. स्वबळाचा नारा दिला आहे. परंतु, राज्यातील अन्य निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढण्याचा विचार ठाकरे गटाचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ठाकरे गट कोणत्या ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढणार, याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, स्वबळाचा नारा दिला, याचा अर्थ महाविकास आघाडी संपली किंवा तुटली, असा काढता येणार नाही. हा विषय मुंबईपुरता आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईवर अनेक वर्षांनी शिवसेनेचा पगडा आहे. शिवसेनेने इथे सातत्याने आपली पकड मजबूत ठेवली आहे. ती तशीच ठेवायची असेल तर स्वबळावर लढले पाहिजे, असे मत कार्यकर्त्यांचे आहे. कार्यकर्त्यांच्या भावना शिवसेना पक्ष प्रमुखांनी व्यक्त केल्या आहेत. ही परिस्थिती इतर शहरात किंवा जिल्ह्यात असेल का, याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे तिथे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, एकत्र लढणे गरजेचे आहे, त्या-त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या भूमिका लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेऊ, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
आम्ही महानगर पालिका ताकदीने लढवू
विधानसभा, लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. लोकसभेत आम्ही जिंकलो, विधानसभेत पराभूत झालो. त्याची कारणे संपूर्ण देशाला समजलेली आहेत. त्या पराभवाने खचून न जाता पुढील सर्व निवडणूका आम्हाला लढवाव्याच लागतील, त्यासाठी तयारी सुरू आहे. आम्ही महानगर पालिका ताकदीने लढवू. मुंबईची परिस्थिती, रचना आणि विषय वेगळे आहेत. महाराष्ट्र मोठा आहे. प्रत्येकाच्या काही भूमिका आहे. कोण म्हणत आहे की, स्वबळावर लढले पाहिजे, तर काही जण म्हणत आहेत की, महाविकास आघाडीबरोबर राहिले पाहिजे. पण मूळात प्रत्येक बुथवर मजबुतीने काम करणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी विधानसभेसाठी निर्माण झाली. इंडिया आघाडी लोकसभेसाठी निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीत काय करायचे, याबाबत तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते बसून निर्णय घेतील, असे संजय राऊतांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आपण भ्रमात राहिलो म्हणून आपली फसगत झाली. तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगा, आपल्याशी कपटाने वागणाऱ्यांना उचलून आपटण्याची हिंमत तुम्ही दाखवणार असाल, सूड घेणार असाल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मी एकट्याने लढल्याशिवाय राहणार नाही. महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्याच्या मनाप्रमाणे निर्णय घेईन, अशा शब्दांत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल भाष्य केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त अंधेरी येथे बोलत होते.