मुंबई : १९९३च्या मुंबईतील भीषण बॉम्बस्फोटांच्या काळात घातक शस्त्रे बेकायदेशीरपणे बाळगल्याबद्दल शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तला वारंवार रजा कशी दिली जाते, याची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले. गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितले की, या प्रकरणी पुण्याच्या तुरुंग उप महानिरीक्षकांना चौकशी करून अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.शिंदे म्हणाले की, संजय दत्तसोबत शिक्षा भोगत असलेल्या इतर चार-पाच कैद्यांनीही फर्लो रजेसाठी अर्ज केले होते, पण एकट्या संजय दत्तला १४ दिवसांची रजा मंजूर केली गेली, अशी माहिती मला मिळाली आहे. ही सवलत दत्त याला कोणत्या नियमानुसार दिली गेली व इतरांना का नाकारली गेली, याची चौकशी होणे गरजेचे आहे.१४ दिवसांच्या फर्लो रजेवर संजय दत्त बुधवारी पुण्याच्या येरवडा तुरुंगातून विशेष विमानाने घरी परतला. पत्नी मान्यता हिच्या आजारपणाच्या कारणावरून याआधी त्याला गेल्या वर्षी आॅक्टोबर व डिसेंबरमध्ये प्रत्येकी २८ दिवसांची फर्लो रजा मंजूर करण्यात आली होती. त्यावेळी मान्यता एका चित्रपटाच्या प्रीमियरला व एका सेलेब्रिटी पार्टीला हजर राहिल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्याने तिच्या आजारपणाविषयी व त्याआधारे संजय दत्तने दिलेल्या रजेच्या कारणाच्या खरेपणाबद्दल संशय व्यक्तकेला गेला होता. एवढेच नव्हे तर संजय दत्तला शिक्षेत झुकते माप दिल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी त्यावेळी येरवाडा कारागृहाबाहेर उग्र निदर्शनेही केली होती. याविषयी उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल झाली असून न्यायालयाने सरकारला खुलासा करण्यास सांगितले आहे.संजय दत्तला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली असून आधी व आता मिळून त्यापैकी त्याची सुमारे निम्मी शिक्षा भोगून झाली आहे. (विशेष प्र्रतिनिधी)
संजय दत्तच्या रजांची चौकशी
By admin | Updated: December 27, 2014 04:31 IST