- डिप्पी वांकाणी/लक्ष्मण मोरे, मुंबई/पुणेमुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तने कारागृहात गेल्या तीन वर्षात कागदी पिशव्या तयार करण्याच्या कामामधून अवघी ४४० रुपयांची कमाई केली आहे. तो २५ फेब्रुवारीला बाहेर येणार असून त्याला सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारात सोडण्यात येईल. त्याला २५६ दिवसांची सूट देण्यात आली आहे. नियमानुसार त्याच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होत असल्याची माहिती कारागृह प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी दिली.गुरुवारी त्याला नियमानुसार न्यायालयीन कक्षामध्ये नेऊन नोंदीनुसार त्याच्या शरीरावरील चिन्हे तपासून तो संजय दत्तच असल्याची शहानिशा करण्यात येईल. त्याला न्यायला येणाऱ्या कुटुंबीयांना कारागृहाबाहेरच थांबवण्यात येईल. संजय दत्तचा निरोप समारंभ होणार नाही. येरवडा कारागृहातील रेडिओ स्टेशनवर कार्यक्रम होणार नाही,असे कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तो आमच्यासाठी सामान्य कैदीच असून, आजवर केलेल्या कागदी पिशव्या बनवण्याच्या कामाची कमाईचे ४४० रुपये त्याला देण्यात येतील, असे कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले. संजय दत्त २१ मे २०१३ पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. आॅक्टोबर २०१३ मध्ये त्याला फर्लो मंजूर झाली होती. त्यांनतर त्याला १४ दिवसांची सुटी वाढवून देण्यात आली होती. पुन्हा २०१४ मध्ये त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. ही सुट्टी पुढे ६० दिवस वाढवण्यात आली. डिसेंबर २०१४ मध्ये पुन्हा १४ दिवसांची फर्लो मंजूर करण्यात आली. ती संपल्यानंतर कारागृहात दोन दिवस उशिरा त्याने हजेरी लावली होती.
संजय दत्तची कमाई केवळ ४४० रुपये
By admin | Updated: February 23, 2016 01:05 IST