काश्मीरमधील नौशेरा येथे झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र संदीप सावंत यांना वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 19:15 IST
जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.
काश्मीरमधील नौशेरा येथे झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र संदीप सावंत यांना वीरमरण
श्रीनगर/सातारा - नववर्षाच्या सुरुवातीलाच जम्मू काश्मीरमधील नौशेरा विभागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र नाईक संदीप सावंत यांच्यासह दोन जवानांना वीरमरण आले आहे. संदीप सावंत हे सातारा जिल्ह्यातील कराड येथील रहिवासी होते.
जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत शोघमोहीम सुरू केली. त्याचदरम्यान, लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन जवान शहीद झाले होते. यामध्ये नाईक संदीप रघुनाथ सावंत यांचा समावेश आहे. संदीप सावंत यांच्यापश्चात त्यांची पत्नी सविता आहेत. सावंत हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील मुंडे गावातील रहिवासी होते. सावंत यांच्यासोबत रायफलमॅन अर्जुन थापा मगर यांनाही वीरमरण आले. ते नेपाळमधील रहिवासी होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी अतिशय आक्रमकपणे उत्तर दिल्याने पाकचे सहा जवानांना ठार झाले होते. काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारताच्या हद्दीतील गावांमध्ये पाकिस्तानी लष्करातर्फे वारंवार गोळीबार व तोफांचा मारा सुरू असल्याने भारतीय जवानांनीही त्यांना तसेच उत्तर दिले. पाकिस्तानी सैनिकांनी पूंछ जिल्ह्यातील राजोरी सेक्टरमध्ये गोळीबार केला आीणि तोफांचाही मारा केला होता. गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमधील दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून, सरत्या वर्षामध्ये काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली. तसेच दहशतवादी संघटनांमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या दहशतवाद्यांच्या संख्येतही मोठी घट झाल्याची माहिती जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी मंगळवारी दिली होती.