Beed Sarpanch Issue News: राज्यभर गाजलेले सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण अन् हत्या प्रकरण आणि मस्साजोगशी संबंधित सर्व गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे गेला आहे. सीआयडीचे अधिकारी पीडित कुटुंबियांना न भेटताच गेल्यामुळे गावकरी आणि कुटुंबीय नाराज झाले आहेत. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्यामुळे हे प्रकरण राज्यात गाजले. यानंतर महाविकास आघाडीसह विरोधकांनी या प्रकरणी महायुती सरकारवर हल्लाबोल केला असून, मनोज जरांगेंपासून ते अंजली दमानिया यांच्यापर्यंत अनेक जण बीडमध्ये भेटी देत आहेत. तसेच मोर्चेही काढले जात आहेत. यातच संभाजीराजे छत्रपती यांनी या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणी संभाजीराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. संतोष देशमुख यांनी क्रूर हत्या झाली, महाराष्ट्रामध्ये भीषण परिस्थिती झाली आहे. मला बोलायलाही लाज वाटते. महाराष्ट्राचे बीड झाले आहे, १९ दिवस झाले अजून अटक नाही, वाल्मिक कराड बेपत्ता आहे. अशी प्रकरण राज्याला परवडणारे आहे का, बीडमध्ये जे चालले आहे ते तुम्हाला पटते का, बीडची गुन्हेगारी पाहून मी चकित झालो, स्वत: मुंडे यांचा हातात बंदुक घेऊन फोटो आहे, हे काय दहशत माजवण्याचा प्रकार आहे का? त्यांना मंत्रिपद देऊ नका असे माझे म्हणणे होते. धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड कुठे आहे, हे माहिती नसणे हे पटणारे नाही. मुंडेंचा राजीनामा घ्यायलाच हवा, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.
राज्यात हा बीड पॅटर्न कुठे होऊ नये
अजितदादा परखड म्हणता मग त्यांना संरक्षण देताय, ते तुम्हाला पटतेय का, महाराष्ट्रामध्ये काय चालले आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कौशल्य दाखवा, खऱ्या आरोपीला अटक करून दाखवा. कराड याला संरक्षण देणारे तिथले मंत्री यांची हकालपट्टी का झाली नाही? त्यांचा राजीनामा का घेतला नाही? हा आमचा सवाल आहे. राज्यात हा बीड पॅटर्न कुठे होऊ नये याची दक्षता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घ्यावी. सरपंचाची हत्या होत आहे. आरोपींचा थेट संबंध दिसून येतो. त्यांचा कंपनीत भागीदारी आहे, त्यांचे सातबारा पुढे आले आहे, या शब्दांत संभाजीराजे यांनी निशाणा साधला.
दरम्यान, मुख्यमंत्री तुम्ही तोंडघाशी पडणार, तुम्ही ज्यांना वाचवतात त्यामुळे तुम्ही तंगडी वर करून पडताल. मुख्यमंत्री मराठे तुमच्या विरोधात जातील. मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालत आहेत, आरोपीला सांभाळायचे काम मुख्यमंत्री करत आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.