मुंबई : रंगभूमी तसेच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीवर आपल्या सशक्त अभिनयाचा विलक्षण ठसा उमटविणारा ‘व्हिलन’ आणि सामाजिक जाणिवेतून सातत्याने समाजकार्यात पुढाकार घेणारा सदाशिव अमरापूरकर हा ‘रिअल हीरो’ सोमवारी पहाटे काळाच्या पडद्याआड गेला. वयाच्या अवघ्या ६४व्या वर्षी झालेल्या त्यांच्या निधनाने केवळ नाट्य व चित्रपटसृष्टीचीच नव्हे, तर सामाजिक क्षेत्राचीही मोठी हानी झाली.ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना फुप्फुसाच्या आजारामुळे काही दिवसांपूर्वी अंधेरीच्या कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही काळ त्यांची प्रकृती स्थिर होती. पण सोमवारी पहाटे उपचारादरम्यान पावणेतीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा आणि सायली, केतकी व रीमा या विवाहित कन्या, जावई तसेच नातवंडे आहेत.गंभीर बाजाच्या भूमिकांसह विनोदी भूमिकांमध्येही त्यांनी ठसा उमटवला. तब्बल तीन दशके त्यांनी नाटक व चित्रपट क्षेत्रात मुशाफिरी केली आणि रसिकांना विविधरंगी अभिनयाची मेजवानी बहाल केली. ‘बॉम्बे टॉकीज’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. अमरापूरकर यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनातही सहभाग घेतला. अमरापूरकर यांचे पार्थिव सोमवारी सकाळी ११ वाजेपासून विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तिथे मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, दिग्दर्शक गोविंद निहलानी, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह विश्वास पाटील, भरत जाधव, जयवंत वाडकर, सविता मालपेकर, चंद्रकांत कुलकर्णी, किशोरी शहाणे आदींनी त्यांना भावांजली वाहिली. (प्रतिनिधी)
सदाशिव अमरापूरकर काळाच्या पडद्याआड
By admin | Updated: November 4, 2014 03:29 IST